डंपरचालक मालक संघटना आक्रमक
⚡बांदा ता.२४-: महाराष्ट्रातून गोव्यात होणार्या खनिज वाहतुकीवर ५०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत रॉयल्टी आकारण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून सुरु झाली आहे. याबाबत डंपर चालकांमध्ये असंतोष पसरला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पेडणे मामलेदार श्री. मुळीक हेही चेकपोस्टवर हजर आहेत.
गोवा राज्य शासनामार्फत गोव्यात येणाऱ्या खनिज वाहतूकीवर रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा चाकी वाहनांवर ५०० रुपये व त्यावरील वाहनांवर १ हजार रुपये रॉयल्टी आकारण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरु झाली आहे. डंपरचालकांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पत्रादेवी चेकपोस्टवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पेडणे तहसीलदार मुळीक हे घटनास्थळावर लक्ष ठेऊन आहेत. आरटीओ अधिकारी तसेच उत्तर गोवा पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत.
या अन्यायकारक प्रक्रियेबाबत डंपरचालक मालक संघटनाही अॅक्शन मोडवर आली आहे. डंपरचालक मोठ्या संख्येने बांद्यात दाखल झाले आहेत. संघटनेची गुप्त बैठक बांद्यात घेण्यात येत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
