तेलाचा दुष्परिणाम रोखण्यासाठी चिवला बीच किनारी रंगीत तालीम

कोस्ट गार्ड, मालवण तहसील प्रशासनाचे आयोजन;पार्थ समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याने प्रशासनाचे प्रयत्न

⚡मालवण ता.२३-: विजयदुर्ग – देवगड दरम्यानच्या समुद्रात पार्थ हे तेलवाहू जहाज बुडल्यानंतर त्यातून तेल गळती सुरू होऊन समुद्रात व किनाऱ्यावर तेल प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याने याबाबत करावयाच्या उपाययोजना बाबत आज मालवण तहसील प्रशासन व कोस्ट गार्डमार्फत चिवला बीच येथे रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी कोस्ट गार्ड रत्नागिरीचे सहायक कमांडींग ऑफिसर सचिन सिंग यांनी यावेळी मार्गदर्शन करत समुद्राच्या पाण्याच्या सध्याच्या प्रवाहाबरोबर हे तेल पुढे सरकल्यास त्याचा मालवण किनारपट्टीला जास्त धोका निर्माण होऊ शकतो, त्यासाठी नागरिकांनी तत्पर राहावे, असे सांगितले. तर तेलगळती बाबत प्रशासनाने दिलेल्या माहिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसिलदार अजय पाटणे यांनी यावेळी केले.

विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या ४० ते ४५ वाव खोल समुद्रात पार्थ या तेलवाहू जहाजाला १६ सप्टेंबर रोजी जलसमाधी मिळाली होती. मात्र या जहाजातून तेल गळती सुरु झाल्याने समुद्रात तेल प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. हे तेल समुद्र किनाऱ्यावर येण्याची शक्यता असल्याने यासाठी करावयाच्या उपाययोजनाची माहिती देण्यासाठी आज मालवण तहसील प्रशासन व कोस्टगार्ड यांच्या वतीने आपत्ती पूर्व नियोजन व तेल तवंग नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक चिवला बीच येथे कोस्ट गार्ड रत्नागिरीचे सहायक कमांडींग ऑफिसर सचिन सिंग यांच्या उपस्थितीत दाखवून रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी किल्ला रिसॉर्ट येथे आयोजित बैठकीत सचिन सिंग यांनी तेलगळती व त्यापासून समुद्र व किनारी भागात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मालवण पोलीस निरिक्षक विजय यादव, मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र मालवणकर, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यानंतर चिवला बीच येथे उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. किनाऱ्यावर तेल आल्यास तेलावर लाकडाचा भुसा टाकून ते भूशात एकजीव झाल्यावर ते फावड्याने गोळा करून किनाऱ्यालगत खणलेल्या खड्ड्यांमध्ये एकत्र करण्यात येईल. तसेच समुद्रातील तेल लाटांद्वारे किनाऱ्यावर येत असताना मासेमारी जाळीत पालापाचोळा बांधून त्याचा किनाऱ्यावर अडथळा निर्माण करून तेल किनाऱ्यावर येण्यापूर्वी समुद्रातच कसे रोखता येईल याची प्रात्यक्षिके यावेळी कमांडींग ऑफिसर सचिन सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दाखविले.

समुद्रातील पाण्याच्या सध्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे सुरू प्रवाहानुसार गळती झालेले तेल मालवण व वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर जास्त प्रमाणात येण्याचा धोका आहे. तसेच हा तेल तवंग गोवा किनारपट्टीवरही जाऊ शकतो. मात्र पाण्याचा प्रवाह बदलल्यास इतर किनाऱ्यावरही तेल तवंग आढळू शकतो. तेल किनाऱ्यावर आल्यास त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांनी तत्पर राहून तेलामध्ये किनाऱ्यावरील कचरा मिसळू नये यासाठी प्रथम किनारे स्वच्छ करावे, असे यावेळी सचिन सिंग यांनी सांगितले. तर यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी शासनाच्या आदेशानुसार व काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तेलगळती बाबत समाज माध्यमावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासनाकडून जी माहिती देण्यात येईल त्यावरच नागरिकांनी विश्वास ठेवावा असे सांगितले.

यावेळी मालवण मधील किनारपट्टी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, स.का. पाटील महाविद्यालयाचे एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, नागरिक, मच्छिमार उपस्थित होते.

You cannot copy content of this page