एमकेसीएल रोटरी आयकॉनिक पर्सनालीटी २०२२ स्पर्धा परीक्षेचे आयोजन

प्रणय तेली यांची माहिती

ओरोस ता.२३-:

सिंधुदुर्ग रोटरी परिवार आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अकरावी ते पंधरावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “एमकेसीएल रोटरी आयकॉनिक पर्सनालीटी २०२२” ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एकूण चार टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील मुलांमधील व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे एरिया गव्हर्नर प्रणय तेली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


जिल्ह्यातील मुले हुशार आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे ही मुले मागे पडतात. त्यामुळे या मुलांचा व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब यांनी संयुक्त माध्यमातून हा उपक्रम घेतला असल्याचे या प्रसिध्दी पत्रकार नमूद करण्यात आले आहे. यावेळी रोटरीचे गव्हर्नर दीपक बेलवलकर, निता गोवेकर, शशिकांत गोवेकर, सावंतवाडी अध्यक्षा डॉ विनया बाड, सेंट्रल रोटरी क्लब अध्यक्ष उदय जांभवडेकर, कणकवली अध्यक्षा वर्षा बांदेकर, कार्यक्रम व्यवस्थापक प्रमोद भागवत, व्यंकटेश मानसपुरे, दिनेश आजगांवकर, व्हिक्टर फर्नांडिस आदी उपस्थित होते.
यासाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची चाचणी घेणारी २५ गुणांची लेखी परीक्षा पहिल्या टप्प्यात १ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर स्वतःची आयडीयल ओळख देणारा सेल्फी व्हिडिओ तयार करून देण्यात येणाऱ्या लिंकवर अपलोड करायचा आहे. यासाठी ६ ते १३ ऑक्टोबर हा कालावधी असणार आहे. १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी परीक्षक फेरी घेतली जाणार आहे. तर ७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ११ विविध ठिकाणी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या स्पर्धा परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला लॅपटॉप, द्वितीय येणाऱ्यास टॅबलेट तर तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला मोबाईल बक्षीस म्हणून दिले जाणार आहे, असे या प्रसिध्दी पत्रकात प्रणय तेली यांनी नमूद केले आहे.

You cannot copy content of this page