मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची माहिती
ओरोस ता.२३-:
सिंधुदुर्ग जिल्हा उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २६ पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव निमित्त विशेष अभियान राबविण्यात येत आहे. “उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा” , असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील महिला बचतगटांना विविध व्यवसायासाठी या ९ दिवसांत तब्बल ३० कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया १० कोटींचे तर अन्य बँका २० कोटींचे कर्ज वितरण करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नवरात्रोत्सवात महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी उमेद अभियानाच्या जिल्हा कक्षा मार्फत पाऊल उचलण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी प्रशासक नायर यांनी आपल्या दालनात दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मुकेश मेश्राम, नाबार्ड उप प्रबंधक अजय थुटे, उमेद राज्य कक्ष व्यवस्थापक समीर पठाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, ग्रामीण स्वरोजगार संचालक राजाराम परब, बँक ऑफ इंडियाचे ऋषिकेश गावडे, कॅनरा बँकेचे विक्रम विभुते, भारतीय स्टेट बँक जिल्हा समन्वयक विनायक कुराडे, उमेद अभियानचे निलेश वालावलकर यांच्यासह अन्य अधिकारी, विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
