रस्त्याच्या मध्यभागी खड्ड्यांचे साम्राज्य ः लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
⚡बांदा ता.२३-: बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले भागातून प्रवास करणे धोकादायक बनत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडले. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत मार्ग निर्धोक करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाकडे जाणाऱ्या बांदा-शिरोडा मार्गावर पाडलोस ते शेर्ले दरम्यान अपघाती खड्ड्यांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून चालकांना वाहन चालवताना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. यात वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मार्गावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज चुकन अनेक अपघात झाले. अनेक वेळा खड्डे बुजविण्यात आले परंतु पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे उखडून जातो. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची डागडुजी करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
स्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत धरून चालवावे लागते. ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असून खड्ड्यांमुळे वाहने वारंवार दुरूस्त करावी लागतात. संबंधित विभागाने याकडे अभ्यासपूर्वक लक्ष देत वारंवार निधी खर्ची न घालता एकदाच दर्जेदार काम करणे अपेक्षित असल्याचे प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांनी सांगितले.
