कणकवली रेल्वे स्टेशन ते मुडेश्वर मैदान रस्ता रुंदीकरण व फुटपाथ होणार

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची कणकवली नगराध्यक्षांची माहिती

⚡कणकवली ता.२२-:
कणकवली शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विषयी संबंधित असलेल्या प्रश्नांबाबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले रवींद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवकांनी अभिनंदन केले.
यावेळी कणकवली शहरातील नागवे रोड ची दुरावस्था झालेली असून या रस्त्याच्या कामाकरिता निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी तात्काळ मान्य करण्याची ग्वाही श्री चव्हाण यांनी दिल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. तसेच बजेटमध्ये तात्काळ या निधीला मंजुरी देऊन लवकरच हे काम मार्गी लावले जाईल असेही बांधकाम मंत्र्यांनी सांगितल्याचे श्री नलावडे म्हणाले. तर कणकवली नरडवे रोड येथील रेल्वे पुलाच्या पुढील रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण चे काम मंजूर करून त्याच सोबत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ चे काम देखील मुडेश्वर मैदानापर्यंत करण्याची मागणी कणकवली नगरपंचायत च्या वतीने बांधकाम मंत्र्यांकडे करण्यात आली. कणकवली शहरातील अनेक लोक मॉर्निंग वॉक साठी या रस्त्यावर सकाळी जात असतात. अशावेळी कणकवली नरडवे चौक ते मुडेश्वर मैदान पर्यंत दोन्ही बाजूने जर फूटपाथ केले गेले तर कणकवली वासीयांना चालण्यासाठी ही एक नवीन सुविधा उपलब्ध होईल याकडे बांधकाम मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. या कामाला देखील बांधकाम मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सामाजिक कार्यकर्ते राजु गवाणकर, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page