अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांचा समावेश
सिंधुदुर्गनागरी ता २१
स्वच्छ हरित ग्राम व जल समृध्दी गाव या शाश्वत विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा २२ व २३ सप्टेंबर रोजी पुणे येथे केंद्र व राज्य शासनाच्या मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यशाळेला जिल्हा परिषद अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, सरपंच यांचा समावेश असलेली २० जणांची टीम आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुणे येथे कार्यशाळेसाठी रवाना झाली आहे.
पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यमंदिर चिंचवड येथे २२ व २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत विकास ध्येयावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे ५ अधिकारी, ५ ग्रामसेवक व विस्तार अधिकारी आणि १० सरपंच आज रवाना झाले. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. पुणे येथील या कार्यशाळेत जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री, केंद्र व राज्य सरकारचे सचिव आदी प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत स्वच्छ व हरित ग्राम, जल समृध्द गाव या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातून यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, पाणी व स्वच्छता मिशन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, मालवण गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे यांच्यासह कुडाळ, व कणकवलीचे ग्राम विस्तार अधिकारी, व बापर्डे, वानिवडे,बूधवळे-कुडोपी, चे ग्रामसेवक तसेच बीळवस, भोगवे, पावशी, कुंदे, पिकुळे, साकेडी, कोळोशी, उंबर्डे, हडपिड बापर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचा समावेश आहे.
