जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये रात्रीस खेळ चाले

मनसेचा आरोप: गैरकारभार चालत असल्याचा केला आरोप

सिंधुदुर्गनागरी ता २१
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “रात्रीस खेळ चाले “! ची तालीम सुरु असून
रात्रीच्या वेळी कंत्राटदार व कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून गैरकारभार केला जात आहे.याबाबत आज
मनसेच्या पदाधिकाऱ्या नी पर्दाफाश केला .तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच कर्मचाऱ्यांविरोधात याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यानी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यमय घडामोडीनंतर नव्याने सुरू झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मध्यरात्री कार्यालय उघडून प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचारी व खरेदी संबंधित पुरवठादार यांच्याकडून रात्रीच्या काळोखात संगनमत करून कागदपत्रांची अदलाबदल होत असल्याचे उघड झाले आहे. खरेदीच्या आडून चाललेल्या भ्रष्टाचाराचा मनसे पदधिकाऱ्यानी पर्दाफाश केला.
मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,अणाव सरपंच आपा मांजरेकर,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,अमोल जंगले आदी पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात आज बुधवारी धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचारी कोणाच्या आदेशावरून कार्यालयाच्या फाइल्स कंत्रातदाराला दाखवत होता,निविदा प्रक्रिया मॅनेज करून शासकीय निधीवर डल्ला मारण्यामागे कोण आहे,प्रशासकीय अधिकारी व कार्यालय अधिक्षकांना कल्पना नसताना शासकीय कार्यालायत रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे धुडगूस कोणाच्या आशीर्वादाने चालतो अशा प्रश्नांची सरबत्ती करत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.एस एस मोरेंना धारेवर धरले. झालेल्या प्रकारची आपणासही कल्पना नसल्याची कबुली दिल्याने अंधारात कारभार चालविण्यामागे नेमके कोण आहे ते उजेडात येणे गरजेचे असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या खरेदी व भरती भ्रष्टाचाराबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांची भेट घेणार असल्याचे उपरकर यांनी स्पष्ट केले.चार महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या खुर्च्या मोडून पडल्यात,कार्यालयीन डेस्क तुटून पडलेत, टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य अनेक महिने धूळखात पडलेय त्यामुळे यापूर्वी केलेली खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले. महाविद्यालयात ग्रंथपाल नियुक्त नसताना ७० लाख रुपयांची खरेदी स्वतः वैद्यकीय अधिष्ठातांनी दिल्लीत जाऊन परस्पर केल्याचा आरोप उपरकर यांनी यावेळी केला तर कार्यालयीन लिपिक फुसांडे यांच्या भरती प्रक्रियेतील गैर कृत्याबाबत शिस्तभंगाची कारवाई अद्याप का झालेली नाही, कोट्यावधीची खरेदी केली जाते मात्र राष्ट्रपुरुषांचे कार्यालयात फोटो का लागले गेले नाहीत असा प्रश्र तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला. या सर्व प्रकाराबाबत येत्या तीन दिवसात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी मनसे शिष्ट मंडळाला दिले आहेत. अशी माहिती मनसे सरचिटनीस परशुराम उपरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

You cannot copy content of this page