⚡मालवण ता.२१-: मालवण तालुक्यातील हिवाळे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक शंकर कदम यांना काल सर्पदंश झाल्यावर कट्टा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गोदमवाड व डॉ. साळसकर यांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. डॉ. गोदमवाड व डॉ. साळसकर यांनी व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल श्री. कदम यांनी आभार मानले आहेत.
हिवाळे येथील आरोग्य उपकेंद्र हिवाळे गावडेवाडीचे आरोग्य सेवक शंकर कदम यांना काल सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान दरवाजा खोलताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. यानंतर श्री. कदम हे आपल्या वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोदमवाड यांनी प्राथमिक उपचार करुन लगेच कट्टा येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. कट्टा ग्रामीण रुग्णालयात डॉ. सौ. गोदमवाड यांनी त्वरित उपचार करुन आरोग्य सेवक कदम यांचे प्राण वाचविले. आज आरोग्य सेवक कदम यांना घरी पाठविण्यात आले. यात डॉ. सौ. साळसकर यांनीही मोलचे सहकार्य केले. त्याबद्दल आरोग्य सेवक कदम यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.
