बांदा /प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणानी, फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल पथकाच्या गजरात येथील पोलीस ठाण्यातील श्री पाटेश्वर मंदिरातील एकवीस दिवसांच्या गणपती बाप्पाला मिरवणूकीने काल सायंकाळी उशिरा तेरेखोल नदीपात्रात निरोप देण्यात आला. स्वतः पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी यावेळी ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
पोलीस ठाण्यात दरवर्षी २१ दिवस गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालेत. तर २० व्या दिवशी डबलबरी भजनी सामना झाला. शहरातील तसेच परिसरातील विविध मंडळे तसेच सेवाभावी संस्थानी भजने सादर केलीत. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी वेतोरे येथील सिंधुरत्न ढोलपथकाने विसर्जन मिरवणुकीत रंगत आणली. संपूर्ण बांदा शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा तेरेखोल नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थानीही सहभाग घेत ठेका धरला होता.
फोटो :-
बांदा पोलीस ठाण्याच्या गणपतीला मिरवणूकीने निरोप देण्यात आला. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
पोलीस ठाण्याच्या गणरायाला तेरेखोल नदीत २१ दिवसांनी निरोप
