‘बॅ. नाथ पै’ पुरस्कार संपादक विनोद शिरसाठ यांना जाहीर

⚡मालवण ता.२१-: ‘बॅ. नाथ पै’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे ‘ बॅरिस्टर नाथ पै पुरस्कार’ साने गुरुजींनी सुरु केलेल्या साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सेवांगण मालवण येथे आयोजित ‘बॅ. नाथ पै’ यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये २५ हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह असे असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण ही संस्था मूळ साने गुरुजींच्या विचारातून प्रेरणा घेऊन स्थापन करण्यात आली आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे व साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे हे ७५ वे वर्ष आहे. त्यामुळे साधना साप्ताहिकाच्या संपादकांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे या अविरत विचार साधनेला हा मानाचा मुजरा असल्याची भावना परुळेकर यांनी व्यक्त केली. विनोद शिरसाठ हे गेली १८ वर्षे म्हणजे २००४ पासून साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात स्तंभलेखक व अतिथी संपादक म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ युवा संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर कार्यकारी संपादक आणि आता संपादक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक असताना, त्यांचे सहकारी म्हणून विनोद शिरसाठ यांनी बरीच वर्षे काम केले आहे. याशिवाय त्यांच्या संपादकीय लेखांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. विनोद शिरसाठ यांनी साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून माध्यम क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे, असे ऍड. परुळेकर यांनी सांगितले.

बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे गेले वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. दि. २५ सप्टेंबर रोजी जन्मशताब्दी वर्ष समारोप कार्यक्रम सेवांगणमध्ये होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी बॅ. पै यांचे स्मृती दालन निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये बॅ. पै यांची छायाचित्रे, त्यांनी लिहिलेली पत्रे व लेख, भाषणाचे ऑडिओ व त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या इतर गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुलांना नाथ पै यांची माहिती, त्यांचे जीवनकार्य कळावे, यासाठी लेखक निखिल घाणेकर यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या नाथ पै यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच नाथ पै यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page