मालवण येथील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन चौथ्या दिवशी ही सुरूच…

मालवण दि प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यात ठेकेदाराने ठरविलेल्या पगाराप्रमाणे पगार न दिल्याने तसेच पगार वाढ न करणे, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क, पीपीटी किट, ड्रेसकोडसह इतर मागण्यांसाठी मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी शुक्रवार पासून पुकारलेले काम बंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरू ठेवले. या काम बंद आंदोलनामुळे मालवण शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांनी पुढाकार घेत संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत कामगारांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतर ठेकेदाराने कामगारांचा मागील थकीत पगार दोन दिवसात देण्याचे तसेच इतर सुविधा देण्याचे मान्य केल्याने कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आपले आंदोलन स्थगित केले. त्यामुळे उद्या मंगळवार पासून हे सर्व कंत्राटी कामगार कामावर हजर होणार आहेत.

मालवण नगरपालिकेच्या ठेकेदारा कडून अनियमित स्वरूपात मिळणारा पगार, हँड ग्लोव्हज व अन्य सुरक्षा साहित्य न मिळणे यासह अन्य मागण्यांसाठी मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असताना प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते. या पार्श्वभूमीवर कामबंद पुकारलेल्या १५ कर्मचारी यांनी सोमवारी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

दरम्यान कांदळगावकर सर्व कर्मचारी यांच्यासह नगरपसलिकेत दाखल झाले. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. मात्र कामगार प्रश्नी तोडगा काढणे आवश्यक असल्याने पालिका कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांना बोलावून घेत कामगारांच्या मागण्यांबाबत कामगारांसमोर चर्चा करण्यात आली. कामगारांचा मागील थकीत पगार तात्काळ देण्यात यावा. हॅण्डग्लोज, बूट, कोट व अन्य साहित्य कामगारांना तात्काळ मिळावे. भरणा होणाऱ्या पीएफ ची माहिती कामगारांना मोबाईलवर मेसेज स्वरूपात मिळावी. यासह अन्य समस्या प्रशासन स्तरावर सोडवाव्यात. या कामगारांच्या मागण्या कांदळगावकर यांनी मांडल्या.

त्यानुसार ठेकेदाराने कामगारांचा मागील थकीत पगार दोन दिवसात देण्याचे मान्य केले. कामगारांना बूट, कोट व अन्य सुरक्षा साहित्य तात्काळ देण्याचे मान्य केले. तर मागणीनुसार हॅण्डग्लोज देण्याचेही मान्य केले.

सकारात्मक चर्चे नंतर कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन स्थगित करत मंगळवार पासून कामावर हजर होणार असल्याचे स्पष्ट केले.

फोटो : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या पुढाकारातुन कंत्राटी सफाई कामगारांना त्यांच्या मागणीनुसार सुरक्षा साहित्य उपलब्ध करण्यात आले.

फोटो : कंत्राटी सफाई कामगार समस्या प्रश्नी ठेकेदाराबरोबर चर्चा करताना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

You cannot copy content of this page