श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांची माहिती…
मालवण दि प्रतिनिधी
विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त बनलेल्या पार्थ या तेलवाहू जहाजाच्या संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी २१ सप्टेंबरला मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून पाहणी करणार आहेत. सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला, मासेमारीला बाधा पोचू नये यासाठी ही पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर सादर करणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक अहवालाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.
श्री. तोरसकर म्हणाले, दूर्घटनाग्रस्त तेल वाहू जहाज पार्थ संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार संघटना २१ रोजी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. यामध्ये खोल समुद्रातील स्कुबा डायव्हिंगबरोबरच जीपीएस यंत्रणा त्याचबरोबर ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर मच्छीमार संघटना करणार आहेत. सिंधुदुर्गातील सागरी जैवविविधता ही अतिशय संवेदनशील असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा तेल अथवा तत्सम सदृश तवंग पसरल्यास किंवा अन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मासेमारी तसेच जिल्ह्यातील मासेमारी बरोबरच पर्यटनाला पण बाधा येऊ शकते. या जहाजातील डांबर सदृशपदार्थ अथवा डिझेल यांचा भविष्यातील लिकेजचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होऊ नये यासाठी स्वखर्चाने या दुर्घटनेबाबत जिल्ह्यातील मच्छीमार माहिती घेणार आहेत. तसेच वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रशासनासमोर ठेवणार आहेत. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास कोणती उपाययोजना करायला लागेल. याबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन व्हावी याचा पाठपुरावा करणार आहेत. रेडी येथील बार्ज दुर्घटना तसेच अलिबाग जवळील चित्रा आणि खलिजा यावेळी मासेमारी व्यवसाय आणि जैवविविधता यावर मोठा परिणाम झाला होता. यासाठी मच्छीमार संघटनांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. मच्छीमार संघटना तयार करत असलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालाची प्रशासनाने दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी अशी मागणीही श्री. तोरसकर यांनी केली आहे.
