अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे तर बिल न भरण्याचा ग्रामस्थांचा इशारा
⚡बांदा ता.१७-: असुविधांचा सामना करणाऱ्या मडुऱ्यातील नागरिक वीज समस्येमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. अखंडित वीजपुरवठा करण्यास महावितरणला अपयश येत असल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. गेले तीन दिवस मडुरा गावात विजेचा लपंडाव चालू असून स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसू लागल्याने मडुरा गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मडुरा गावात गेले तीन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. मुख्य म्हणजे वीज गुल झाल्यानंतर वायरमन, लाईनमन तसेच सहायक अभियंत्यांचा फोन सुद्धा बंद होतो. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच विजेची अनेक कामे रेंगाळली आहेत अन् आम्हाला आज तीन दिवस काळोखात रहावे लागत आहे. ग्राहक वीजबिले वेळेवर भरत असून त्या मानाने वीजपुरवठा होत नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे यापुढे आम्ही एकही बिल भरणार नसल्याचा इशारा युवासेना सातार्डा उपविभागप्रमुख प्रवीण ऊर्फ पिंट्या परब यांनी दिला आहे.
दरम्यान, सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता श्री. घुरे व बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांनी जुलै महिन्यात ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणावेळी सर्व वीज समस्या मार्गी लावू असे खोटे आश्वासन दिले. गेले तीन दिवस मडुरा गावात वीजपुरवठा केव्हाही खंडित होत असून पुन्हा कधी वीज येईल याची कोणतीच खात्री नाही. काहीवेळा दिवसरात्र वीज नसते त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून नियमित वीज बिल भरणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा नाहक फटका विद्यार्थी, व्यावसायिक तसेच गृहिणींना मोठ्या प्रमाणात बसत आहे. झाडेझुडपे तोडण्यासाठी ग्रामस्थ कायम सहकार्य करत असतात परंतु वीजवितरणचे नाकर्ते अधिकारीच सुस्तावलेले असल्यामुळे अशाप्रकारे ग्रामस्थांना अंधारात रहावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पिंट्या परब यांनी दिली.
