चिपी विमानतळ, आडाळी एमआयडीसी संदर्भात तातडीची बैठक लावा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उद्योग मंत्र्यांकडे मागणी

⚡कणकवली ता.१६-: चिपी परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळ येथे मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत आहेत. नाइट लँडींगची सुविधा नसल्यामुळे तसेच लँडिंग किंवा उड्डाण रद्द होईल या भीतीने तिकीट सवलत देऊनही प्रवासी पाठ फिरवत आहेत. बऱ्याच वेळा विमान कमी दृश्यमानतेमुळे लँडींग झाले नाही, परतीच्या प्रवासाचे विमान उड्डाण झाले नाही या प्रकारामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र विकासक कंपनी व विमानसेवा देणाऱ्या कंपनीने प्रवाशांना वाऱ्यावर सोडले. असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. तसेच या संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करा अशी मागणी राजन तेली यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजन तेली यांनी या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना अश्या वेळी गोवा विमानतळाचा आधार घ्यावा लागत आहे. पैसा व वेळ यांचा फटका यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत आहे. विमानतळ सुरू होऊन १ वर्ष पूर्ण झाले. परंतु कुडाळ ते विमानतळ दरम्यान पाणीपुरवठा वाहिनेचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तसेच विमान तळावर साधी कॅटिंग सुविधाही उपलब्ध नाही. बी . एस . एन . एल सेवा खंडित वारंवार खंडित असणे, रिक्षा, टॅक्सी स्टँड नाही, दळणवळणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या गैरसोयी दूर करणे अति महत्वाचे आहे. तसे न झाल्यास शेजारील गोवा राज्यातील सीमेवर होणाऱ्या मोपा या नवीन विमानतळाचा परिणाम सिंधुदुर्ग विमानतळावर होऊ शकतो. दोडामार्ग मधील आडाळी एम.आय.डी.सी चे भूसंपादन २००९ -२०१० मध्ये होऊन अजूनही कामांमध्ये प्रगती नाही . सिंधुदुर्गातील उद्योगधंदे व रोजगार वाढविण्यासाठी सदर आडाळी एम.आय.डी.सी चे काम लवकरात लवकर पूर्ण होणेकरिता संबंधित अधिकाऱ्या समवेत वरील दोन्ही विषया संदर्भात आपल्या दालनात बैठक आयोजित करावी अशी मागणी राजन तेली यांनी केली आहे.

You cannot copy content of this page