ग्राहकांनी नुसत्या अफवांवर विश्वास ठेवू नये

नाभिक संघटनेचे राज्य पदाधिकारी विजय चव्हाण यांचे आवाहन

⚡मालवण ता.१५-: गेले काही दिवस सोशल मीडियावर हेअर ड्रायरमुळे सलूनमध्ये आग लागल्याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे काही सलून व्यावसायिक आणि समाज बांधवांकडूनही विविध ग्रुपवर हाच व्हीडिओ शेयर केला जात आहे. एक खबरदारी अथवा दक्षता म्हणून सलून व्यावसायिकांसाठी संबंधित व्हीडिओ एक मार्गदर्शक म्हणून योग्य असला तरी अशा व्हायरल व्हीडिओमुळे सलून व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे या व्हीडियोवर जागृती निर्माण करून आपल्या ग्राहकांमधील संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. मुळात ही घटना खूप जुनी असून ती बांग्लादेशमध्ये घडलेली आहे. एसी सलूनमध्ये एसीच्या गॅस गळतीमुळे आणि हेअरडाय करताना वापरलेल्या जेलीमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे नुसत्या हेअरडायरमुळे आग लागली नाही. ग्राहकांनी नुसत्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नाभिक संघटनेचे राज्य पदाधिकारी विजय सीताराम चव्हाण यांनी केले आहे.

‘शहरातील सलूनमध्ये आपण अतिसुंदर दिसावं म्हणून आपल्या डोक्यावर असणाऱ्या केसांना विविध
आकार आणि रंगकाम हे सलून व्यावसायिक करीत असतो त्यासाठी पेट्रोलियम जेलीपासून ते वॅक्सपर्यंत आणि पेटोलियम रंग अशी अतिशय ज्वलनशील सामग्री वापरली जाते आणि आपले केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा सर्रास वापर केला जातो. या सर्व साधनांचा आणि धोक्याचा परिपूर्ण अभ्यास आणि दक्षता नसल्याने काय बरं घडतं? एकदा पाहूनच घ्या,’ अशा आशयाचा एक व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असल्याने यामुळे सलून व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्यान, याबाबत नाभिक संघटनेचे राज्य पदाधिकारी विजय सीताराम चव्हाण यांनी पत्रकाद्वारे व्हायरल व्हीडिओतील वास्तव समोर आणले असून ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page