भाजप नेते निलेश राणे यांचा आरोप;पाहणी दौऱ्यात व्यायाम शाळेत साहित्य नसल्याचे झाले उघड
मालवण (प्रतिनिधी)
मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयांच्या शासन निधीतून बसविण्यात आलेले अत्याधुनिक व्यायाम साहित्य नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत असल्याबाबत आज भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यायाम शाळेस भेट देऊन पाहणी केली असता सदर साहित्यच गायब झाल्याचे दिसून आले. व्यायाम साहित्य नित्कृष्ट दर्जाचे असल्याने आमदार नाईक यांनी हे साहित्य पुन्हा कोल्हापूरला नेले असून व्यायाम साहित्याच्या विषयात आम. नाईक यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप निलेश राणे यांनी यावेळी करत आम. नाईक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण पोलिसांकडे करणार आहोत, असेही सांगितले.
ऑगस्ट महिन्यात मालवण नगरपालिकेच्या फोवकांडा पिंपळ येथील व्यायामशाळेत आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयांच्या शासन निधीतून उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र या साहित्याच्या दर्जाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आज भाजप नेते निलेश राणे यांनी व्यायाम शाळेस भेट देऊन पाहणी केली असता नवीन साहित्य गायब असल्याचे दिसून आले. यावेळी राणे यांनी व्यायाम प्रशिक्षक व व्यायामपटू यांच्याशी चर्चा केली असता सदर साहित्य हे सदोष आणि नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने यामुळे अपघात घडण्याची शक्यता असल्याची तक्रार व्यायाम प्रशिक्षकांनी केल्याने हे साहित्य संबंधित ठेकेदाराने परत कोल्हापूर येथे नेल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त बनलेल्या निलेश राणे यांनी आम. वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका करत आरोप केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, सौ. पूजा सरकारे, विजय केनवडेकर, बाबा परब, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, राजू बिडये, पंकज पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, नगरपालिकेच्या व्यायामशाळेत आम. नाईक यांनी २५ लाखांचे साहित्य दिले, मात्र आज व्यायामशाळेत २५ रुपयाचेही साहित्य नाही. हे साहित्य खरेच २५ लाखाचे होते का तसे असते तर पूर्ण व्यायामशाळा साहित्याने भरली पाहिजे होती. हे साहित्य नित्कृष्ट दर्जाचे असून यात चोरीमारी झाली आहे. परत नेलेले साहित्य येणार कधी ? हे साहित्य नेताना मालवण नगरपालिकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. साहित्य आले कधी आणि गेले कधी याबाबत नगरपालिकेकडे कोणतीही नोंद नाही. या साहित्याच्या विषयात आम. वैभव नाईक यांनी शंभर टक्के भ्रष्टाचार केला आहे असा आरोप यावेळी निलेश राणे यांनी केला. आम. नाईक यांच्यावर फसवणुकीचा ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण पोलिसांकडे करणार असून लवकरच लेखी तक्रार पोलिसांना सादर करणार आहोत, असे प्रकार करताना आम. नाईक यांना लाज वाटली पाहिजे, २५ लाख रुपये हे जनतेचे आहेत, ते कुठे गेले हे जनतेला कळले पाहिजे म्हणून आपण आज याठिकाणी पाहणी केली, असेही यावेळी निलेश राणे यांनी सांगितले.
