⚡कणकवली ता.१३-: मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीकिनारी वागदे येथे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या नरडवे येथील प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना आम. नितेश राणे यांनी दहा लाख रुपयाची रोख स्वरूपात आर्थिक मदत केली.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी कै. प्रशांत सावंत यांची पत्नी श्रीमंती सुचिता सावंत व मुलगा कु.प्रथमेश सावंत यांचेकडे ही रोख रक्कम देण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे नरडवे येथील प्रशांत प्रभाकर सावंत यांच्या ताब्यातील क्रूजर गाडीला ट्रेलरने धडक देऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रशांत सावंत हे जागीच मयत झाले होते. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते. त्यानुसार दहा लाख रुपयांची आर्थिक मदत ओम गणेश निवासस्थानी सावंत कुटुंबियांना देण्यात आली.यावेळी जि. प.चे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब,वकील प्रसन्ना सावंत, नरडवे उपसरपंच सुरेश ढवळ आदी उपस्थित होते.
गणेश चतुर्थीपूर्वी शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी गडनदी नजीक वागदे येथे भीषण अपघात झाला होता. ट्रेलरने प्रशांत सावंत यांच्या ताब्यातील क्रुझरला धडक दिली होती. त्यानंतर महामार्गाच्या एका लेनचे काम अर्धवट राहिल्यामुळे हा अपघात झाल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. आंदोलनही झाले होते. त्यानंतर दुसरी लेन तातडीने सुरू करण्यात आली मात्र या अपघातात नाहक बळी गेलेल्या प्रशांत सावंत यांच्या कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीने आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली होती. याच दरम्यान सावंत कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते.आज हे आश्वासन पूर्ण करत तब्बल दहा लाख रुपयांची रोख रक्कम सावंत कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांनी दिले. या आर्थिक मदतीबद्दल कै. प्रशांत सावंत याची पत्नी श्रीमंती सुचिता प्रशांत सावंत, व मुलगा कु. प्रथमेश प्रशांत सावंत यांनी आभार मानले आहेत
