फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा
⚡कणकवली ता.१३-: १९५२ साली स्थापन झालेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय हे पाचवे अपत्य आहे. १२ सप्टेंबर१९९५ साली सुरू झालेल्या या महाविद्यालयाने मागील २७ वर्षात अनेक यशाची शिखरे पार केली. महाविद्यालयाने अनेक उत्तुंग शिखरे पार पाडली. राजकारण करत असताना शिक्षण क्षेत्रात मात्र प्रामाणिकपणे समाजकारण केले आणि त्याच प्रामाणिकपणाचे फळ आज याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे नीट लक्ष दिले पाहिजे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करा. आणि आपला उत्कर्ष साधा आणि त्याचबरोबर ज्ञानदान करणाऱ्या संस्थेला विसरू नका. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच माजी चेअरमन प्रदीप सावंत उर्फ आबु पटेल यांनी केले.
ते कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचा २७ वा वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत,महाविद्यालय प्राचार्य डॉ.फुलझेले,प्राध्यापक डॉ सतीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये डॉ. सतीश कामत म्हणाले ,प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या या शैक्षणिक संकुलामुळे उच्च शिक्षणाची सोय झाली व खऱ्या अर्थाने फोंडाघाट सारख्या ग्रामीण भागाचा विकास झाला. शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर फेकला गेलेला तरुण वर्ग उच्चशिक्षित झाला. यामुळेच महाविद्यालयाने अनेक मान्यता प्राप्त पुरस्कार प्राप्त केले आहेत.
यावेळीअध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत म्हणाले,आत्ताचा महाविद्यालयाचा ऐश्वर्याचा काळ आहे परंतु त्याचा पाया रचणाऱ्यांचे आभार मानतो कारण त्यांनी या वटवृक्षाचे पालन पोषण केले आहे. त्यामुळे मी आज येथे उभा आहे. विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकोप्याने महाविद्यालयाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या केलेल्या सोयीचा उपयोग करून घ्या आणि जीवन यशस्वी करा.असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फुलझेले म्हणाले की ग्रामीण डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली यासारखे परम कार्य कोणते नाही. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्यातून शिक्षण संस्था फुलवून शिक्षणाची बाग निर्माण केली हे कार्य अतुलनीय आहे.
विद्यार्थ्यांच्या मनोगतात खुशी कामतेकर व आयुष सावंत यांनी आपली मनोगते मांडली. त्याचबरोबर महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख दीपक सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष रायबोले यांनी तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले.
