⚡मालवण ता.१३-: कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण करून लिहिणे म्हणजेच लेखक व कवी बनणे होय. लेखक, कवी यांनी वास्तवात जे घडते त्यावर लिहिणे महत्वाचे आहे. आपल्या प्रत्येकामध्ये लेखक किंवा कवी दडलेला असतो, त्याला वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी येथे बोलताना केले.
बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणी मुलुखातील सिद्धहस्त कवी – लेखक डॅा. महेश केळूसकर यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या कै. नरहरी झांट्ये सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. केळुसकर हे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. महेश केळुसकर, सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, नितीन वाळके, सौ. ज्योती तोरसकर, प्राचार्या डॉ. उज्वला सामंत आदी उपस्थित होते. प्राचार्या डॉ. सामंत यांनी प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले.
यावेळी महेश केळुसकर म्हणाले, प्रत्येक गोष्टीत आपण पारंगत होऊ शकतो, प्रत्येकात लेखक कवी दडलेला असून लोक हसतील म्हणून आपण त्यास वाव देत नाही. मात्र लिहिते झाल्यावर तेच लोक तुमची वाहवा करतील. कवी हा सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवतो आणि योग्य वेळी त्यावर लिहितो. आज जग विविध माध्यमातून जवळ आले असून आपण सर्व घटकांशी कनेक्ट राहिले पाहिजे, असेही डॉ. केळुसकर म्हणाले.
यावेळी महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने स्वतः तयार केलेल्या कविता सादर केल्या. तसेच डॉ. महेश केळुसकर यांनी अधांतर अंधारात या पुस्तकामधील एक कविता व झिनझिनाट ही कविता सादर केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. केळुसकर यांनी निरसन केले. यावेळी नितीन वाळके व लक्ष्मीकांत खोबरेकर यांनीही विचार मांडत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास राबते यांनी केले तर आभार प्रा. प्रमोद खरात यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
