निधी उपलब्ध असून पगार देण्याचे उपअभियंता महाले यांचे आश्वासन
⚡कणकवली ता.१३-“ -जि. प. बांधकाम उपविभाग कणकवली अंतर्गत रस्ता कामगारांना गणेशचतुर्थी आधी पगार न मिळाल्याने रस्ता कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या गणेशचतुर्थी सण उत्सवावर विरजण पडले. 12 सप्टेंबर अखेरही पगार न झाल्यामुळे रस्ता कामगारांचा प्रक्षोभ झाला आणि भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून रस्ता कामगारांनी थेट कणकवली पं. स. समोर आंदोलन केले.
उपअभियंता महाले यांच्यासमोर आक्रमक झालेल्या रस्ता कामगारांनी ऐन गणेशोत्सवात पगारअभावी कुटुंबियांवर ओढवलेल्या स्थितीचा पाढाच वाचला. 16 ऑगस्टपासून वरिष्ठांशी संपर्क साधूनही गणेशचतुर्थीला रस्ता कामगारांना पगार मिळाला नाही. मात्र त्यानंतरही 12 सप्टेंबर उजाडुनही
अद्याप हक्काचा पगार रस्ता कामगारांना मिळाला नाही. दर महिन्याला 5 तारीखला पगार झाला नाही तर 6 तारीखला आम्ही उपअभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाचे बाळा साटम, सत्यविजय जाधव यांनी दिला. उपअभियंता महाले यांच्याशी झालेल्या चर्चेत बाळा साटम, सत्यविजय जाधव यांनी रस्ता कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. रस्ता कामगारांना त्यांच्या न्याय्य मागण्या वरिष्ठांकडे मांडण्यापासून कार्यालयातील बाबू लोक अडवतात. रस्ता कामगारांना प्रवास भत्ता का सादर केला जात नाही ? प्रवास भत्ता मागितल्यास आर्थिक मागणी केली जाईल असा दबाव टाकला जातो असा आरोपही यावेळी उपअभियंता महाले यांच्यासमक्षच करण्यात आला. यावेळी शाखा अभियंता सुतार, रस्ता कामगार अशोक घाडी, महादेव जाधव, अनंत जाधव, पुंडलिक चव्हाण, प्रमोद तायशेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता आवटी यांच्याशी उपअभियंता महाले यांनी मोबाईलवर संपर्क साधत चर्चा केली. कार्यकारी अभियंता आवटी यांनी पगारासाठी निधी असून रस्ता कामगारांना तात्काळ पगार दिला जाईल असे महाले याना सांगितले.
