तातडीने आर्थिक मदतीची हमी मिळाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृतदेह घेतला ताब्यात

रेडी येथे तनय सावंत याचा शॉक लागून झाला होता मृत्यू

वेंगुर्ले: रेडी येथील वीज वितरणचा बाह्यत्रोत कर्मचारी तनय जगन्नाथ सावंत या युवकाचा ११ केव्ही लाईन वर काम करत असताना शॉक लागून मृत्य झाला. तनय च्या कुटुंबियांना जोपर्यंत तात्काळ आर्थिक मदत होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान तात्काळ आर्थिक मदतीची हमी विज वितरण च्या अधिकाऱ्यांनी दिल्या नंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील रहिवासी व वीज वितरण विभागाचा बाह्य स्त्रोत कर्मचारी तनय जगन्नाथ सावंत या युवकाला ८ सप्टेंबर रोजी रेडी तेरेखोल रस्त्यावर ११ केव्ही लाईनचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर धारगळ येथील रेडकर रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी उपचारा दरम्यान १० सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर आज तनय चे शव विच्छेदन करून त्याचा मृतदेह रेडी येथे आणण्यात आला. दरम्यान जोपर्यंत वीज वितरण विभाग व ठेकेदार तात्काळ त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करत नाही तसेच त्याच्या कुटुंबियांना पुढील इन्शुरन्स च्या मदतीची ठोस हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर शेकडो ग्रामस्थ दाखल झाले होते. दरम्यान याबाबत वीज कंत्राटी कामगार युनियन सिंधुदुर्गचे नेते अशोक सावंत, सामाजिक कार्यकर्ते शेखर गावकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर रेडी सरपंच रामसिंग राणे, जि प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, सामाजिक कार्यकर्ते अजित सावंत, उपसरपंच नामदेव राणे, सदस्य शेखर वारखणकर यांची वीज वितरण कार्यालय वेंगुर्ला येथे जात अधीक्षक अभियंता विनोद पाटील, उपकार्यका री अभियंता खटावकर, कनिष्ट अभियंता पेडणेकर व दूरध्वनी वरून रिशु किचू इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हा ठेकेदार कंपनीशी संपर्क केला. यावेळी संबंधित ठेकेदार याच्याकडून २ लाख व विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून १ लाख अशी तात्काळ ३ लाखांची आर्थिक मदत व कंत्राटी कामगार ग्रुप इन्शुरन्सचे ७ लाख तसेच त्याच्या पत्नीला दरमहा पेन्शन मिळण्याची हमी अधिकारी यांनी दिल्यानंतर तनय चा मृतदेह सायंकाळी ताब्यात घेण्यात आला. तनय हा रुग्णालयात उपचार घेत असताना वीज वितरण विभागाचे अधिकारी यांनी ७० हजार तसेच वीज वितरण कर्मचाऱ्यांनी ७० हजार व रेडी तील ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत ही केली होती.

फोटो: रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जमलेले ग्रामस्थ

You cannot copy content of this page