⚡मालवण ता.११-:
साहित्यिक हा आपले जगणे आणि आपली भाषा यांचा मेळ साधून साहित्यकृतीची निर्मिती करून ते पुन्हा आपल्या भाषेलाच देत असतो. साहित्यिकाने लिहिलेल्या कवितेत मोठी ताकद असते तर नाटकाची संहिता ही समाजाला मार्गदर्शक असते. प्रत्येक साहित्यिकाचे स्थान हे वाचक ठरवत असतात, म्हणूनच साहित्यिकाने समाजातील प्रश्नांशी संवादी राहून वाचकांप्रति नम्र राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी येथे केले.
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या कविता संग्रहाचे आणि जयंत पवार यांच्या माझं घर या नाटकाचे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, शब्दालय प्रकाशनच्या सुनिता लांडे, डॉ. महेश केळुसकर, संध्या नरे – पवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना म्हणून करण्यात आली. ऍड. देवदत्त परुळेकर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी मैत्रेयी बांदेकर, अक्षय सातार्डेकर, ऋतुजा केळकर यांनी जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकातील सासू, सून आणि मुलगा यांचे संभाषण करीत नाटकाच्या उताऱ्याचे अभिवाचन केले.
या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. महेश केळुसकर म्हणाले, माझा मित्र स्व. जयंत पवार याच्याशी आमचा वेगळा नाते संबंध होता. एकतरी पुस्तक सिंधुदुर्ग मध्ये प्रकाशित व्हावे अशी जयंत पवार यांची इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झाली. समाजामध्ये काही वाईट गोष्टी अथवा चांगल्या गोष्टी लोकांच्या लगेच लक्षात येत नाही काहीवेळा त्यावर आवाज उठविले जात नाहीत त्यावेळी कवितांमधून कथांमधून आम्ही या गोष्टी सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो, असेही यावेळी डॉ. केळुसकर म्हणाले. यावेळी केळुसकर यांनी आपल्या कवितांचे वाचनही केले. यावेळी सुमती लांडे, संध्या नरे यांनीही विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती तोरसकर यांनी केले तर सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, नितीन वाळके, रुजारीओ पिंटो, सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, अरविंद मोंडकर, टोपीवाला हायस्कुलचे संस्था पदाधिकारी चंदू सामंत, मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, डॉ. सुमेधा नाईक आदी व इतर उपस्थित होते.
