विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले सुखरूप बाहेर

न्हावेली नागझरवाडी येथील घटना

सावंतवाडी – मौजे न्हावेली येथील नागझरवाडी येथे राहणारे श्री.रुपेश कृष्णा सवाळ यांना आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घराशेजारी असलेल्या चिरेबंदी विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय सावंतवाडी येथे संपर्क साधला. सदरची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर हे आपल्या बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके हे ही आपल्या बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले.विहिरीचे निरीक्षण केले असता बचाव पथकाला असे निदर्शनास आले की सदर विहिर ही एकूण 40 फुट खोल असून कठड्यापासून सध्याची पाण्याची पातळी अंदाजे 15 फुटावर आहे.

काल रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आल्यावर विहिरीचा अंदाज न आल्यामुळे अपघाताने हा बिबट्या सदरच्या विहिरीत पडला असावा. असा अंदाज व्यक्त केला जातोय. सदर आव्हानांवर संयमाने मात करत वनविभागाच्या बचाव पथकाने सदर बिबट्याला यशस्वीरीत्या लोखंडी पिंजऱ्यात कैद केले.

You cannot copy content of this page