मदतकार्य करीत केली विचारपूस:
प्रशासनाशी सुद्धा केली चर्चा
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात आळवाडी भागात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी कार्यकर्त्यांसह याठिकाणी धाव घेत मदतकार्य केले. यावेळी पूरग्रस्त लोकांची विचारपूस करत तात्काळ मदतकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने तात्काळ सुविधा व मदतकार्य देण्याची मागणी केली.
बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने आज सकाळीच तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आळवाडी बाजारपेठेत घुसले. याची माहिती मिळताच तात्काळ सौ. घारे परब यांनी याठिकाणी धाव घेत माहिती घेतली. येथील पुरस्थितीत मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लाईफ बोट, लाईफ जॅकेट देण्यात आली आहेत. तसेच पुर अलर्ट करण्यासाठी सायरन देखील बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रशासनाने दिलेल्या मदतीची त्यांनी लोकांकडून माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत विनायक परब, वैभव परब, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत गवस आदी उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजता त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच स्थानिकांशी संवाद साधला. तलाठी वर्षा नाडकर्णी या सकाळी ७ वाजल्यापासूनच येथील पुरस्थितीवर लक्ष ठेऊन लोकांना अलर्ट करत असल्याचे समजल्यावर प्रशासनाच्या तत्परतेचे त्यांनी कौतुक केले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून याठिकाणी साहित्य देण्यात आले असून आवश्यक असेल त्यावेळी याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. दरवर्षी पुरस्थितीत येथील व्यापारी व लोकांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न कणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्याकडून परिसरातील पुरस्थितीची माहिती घेतली.
