जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा

मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार

⚡कणकवली ता.११-:
मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या अनेक घटना देशभरात
घडत आहेत. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा, या उद्देशाने जिल्हयातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज ,मुस्लिम संघटनांनी मिळून जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा गुरुवार, १५ सप्टेंबरला सकाळी ११.३० वा. ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चात सहभागी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी येथील म्हाळसाबाई हिंद छात्रालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सत्यशोधक संघटनेचे नेते ॲड. सुदीप कांबळे चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी चंद्रकांत पवार, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संजय तांबे, चर्मकार संघटनेचे महानंदा चव्हाण, कास्ट्राईबचे किशोर कदम उपस्थित होते.
महेश परुळेकर म्हणाले, मडक्यातील पाणी प्यायल्याने राजस्थानमधील इंद्रजीत या चर्मकार समाजातील आठवर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली व त्याचा मृत्यू झाला, या घटनेचा देशभर निषेध होत आहे. गुजरातमधील गैंगरेप प्रकरणातील आरोपींना सोडून देऊन त्यांचे खुलेआम स्वागत केले जात आहे. फी भरली नाही म्हणून उत्तरप्रदेशातील १३ वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. राजास्थान येथे १० जातीयवादी लोकांनी मिळून मागासवर्गीय शिक्षिकेला दिवसाढवळ्या रॉकेल ओतून पेटवून जाळून मारले. या अन्याय अत्याचार, विषमतावादी जातीव्यवस्थेविरोधात संघटीतपणे लढा देण्याची गरज आहे. जातीयवादी घटना सिंधुदुर्गातही

संदीप कदम म्हणाले, जातीय अत्याचाराच्या घटना देशाप्रमाणे महाराष्ट्रात घडत असून सिंधुदुर्गातही ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत घडणाऱ्या घटनांमुळे माणसांच्या मनात चिड निर्माण होत आहे. या अन्यायी, अत्याचारी नराधमांना शिक्षा व्हायला हवी जातीयवादी घटनांविरोधात संविधानवादी मानवतावादी दृष्टीकोन असणाऱ्यांनी संघटीतपणे लढा देणे गरजेचे आहे. जातीयवादी घटना वेदनादायी

सुजीत जाधव म्हणाले, जातीय अत्याचाराच्या घटना देशहिताच्या दृष्टीने चिंता काळजी दु:ख, वेदना, संताप, चिड निर्माण करणान्या आहेत. देशाचे राष्ट्रीय ऐक्य आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्व मानवतावादी आणि मूल्याधिष्ठीत भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी मोर्चामध्ये संविधानवादी मानवतावादी, पुरोगामी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
सुदीप कांबळे म्हणाले, समाजाची व्यवहारीक हतबलता आणि न्यायव्यवस्थेतील अनेक कारणांमुळे न्यायदान प्रक्रियेला विलंब होतो. त्यामुळे अन्यायी, अत्याचारी, नराधमांचे फावते. अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी क्रांतीकारकरित्या एकत्र यावे.

मोर्चेकरी सकाळी ११ वा. ओरोस येथील शिवपुतळ्याकडे जमणार आहोत. तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण, मोर्चेकऱ्यांना संबोधन, सूचना वगैरे झाल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करेल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. पुढे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना सांगितली जाईल. मोर्चात शालेय विद्यार्थी अग्रस्थानी असतील, असे परुळेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page