स्वरसंध्या संगीत रजनीने रसिक मंत्रमुग्ध…

बांदा/प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरसंध्या’ या संगीत रजनीत गायक अक्षय नाईक, विठ्ठल केळुस्कर, नेहा आजगावकर यांनी एकापेक्षा एक अजरामर, सुरमयी व भक्तीगीते, भावगीतांची मेजवानी उपस्थित रसिक प्रेक्षकांसमोर सादर करत मंत्रमुग्ध केले. नाट्यसंगीताबरोबरच नांदी, भारुड, लोकगीते, गणेश वंदन यांचे उत्कृष्ट सादरीकरण या कलाकारांनी करत तब्बल तीन तास रसिकांना जाग्यावरच खिळवून ठेवले.
या मैफिलीचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी त्यांच्या काव्यात्मक खुमासदार शैलीत पेश करून रसिकांची वाहवा मिळविली. या काव्य मैफिलीची सुरुवात अक्षय याने ‘सुर निरागस हो’ या गीताने केली. या गीताला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नेहा आजगावकर यांनी ‘मागे उभा मंगेश’ हे भक्तीगीत सादर केले. अक्षय व नेहा यांनी ‘तूच सुखखर्ता, तूच दुःखहर्ता’, ‘ओंकार स्वरूपा’, प्रथम तुला वंदितो’, ‘राधा ही बावरी’, ‘पाहिले न मी तुला’, ‘गजानना श्री गणराया’, ‘येई हो विठ्ठले’, ‘घनराणी…’, ‘पांडुरंग नामी..’, ‘धाव पण स्वामी..’, ‘सुरत पिया..’, ‘बजा रे मुरलिया..’, ‘कानडा राजा पंढरीचा..’ ही गिते सादर केलीत. गायक विठ्ठल केळुस्कर यांनी ‘पदमनाभा..’, ‘अंदाज आरशाचा..’ ही गिते सादर केलीत. तबला साथ करणारे आदित्य वालावलकर व गायक अक्षय नाईक यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावली.
तबला आदित्य वालावलकर, हार्मोनियम निलेश मेस्त्री, ऑक्टॉपड अश्विन जाधव, पखवाज प्रदीप वाळके, कीबोर्ड महेंद्र मांजरेकर यांनी संगीत साथ केली. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उदघाटन माजी सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर आशुतोष भांगले, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, ओंकार नाडकर्णी, प्रीतम हरमलकर, अंकिता स्वार, उमांगी मयेकर आदी मान्यवर तसेच सर्वेश गोवेकर, राकेश केसरकर, निखिल मयेकर, सनी काणेकर, अक्षय मयेकर, संदेश पावसकर, अर्णव स्वार आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांचा व मंडळाच्या क्रियाशील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page