नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बैठकीत मांडली ठाम भूमिका
⚡कणकवली ता.०९-: कणकवली नगरपंचायतीचा सुधारित विकास आराखडा बनवत असताना यापूर्वी झालेला अन्याय होऊ देणार नाही. तसेच जर चुकीचा आराखडा बनवला जात असेल तर सत्ताधारी म्हणून नगरपंचायतचा ठराव आवश्यक असतो. तो ठराव आम्ही देणार नाही अशी ठाम भूमिका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मांडली.
कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही भूमिका घेतली. नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेली ही बैठक म्हणजे अंतिम बैठक नाही. आता यापुढे अनेक बैठकी होतील. प्रत्येक नागरिकांचे मत यात विचारात घेतले जाईल असेही नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहराची सध्या आरक्षणे आहेत ती आमची पिढी व आमची पुढची पिढी आली तरी संपूर्ण डेव्हलप होणार नाहीत. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. असेही श्री. नलावडे यांनी सांगितले. जर या सुधारित करण्यात येत असलेल्या डीपी प्लानमध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कणकवलीतल्या जनतेसाठी आवाज उठवण्याची आमचीही तयारी आहे असे श्री. नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहरात यलो झोन कमी झाला असून आता ग्रीन झोन मधील काही भाग यलो झोनमध्ये आणण्याची गरज असल्याचीही श्री नलावडे यांनी सांगितले. जर या डीपी प्लानमध्ये काही चुकीचं होत असेल तर नगराध्यक्ष म्हणून या ठरावावर सही करणार नाही अशी ठाम भूमिका श्री. नलावडे यांनी बैठकीतही मांडली. जी जुनी घरे आहेत किंवा जुने बिनशेती प्लॉट आहेत त्यावर त्यावेळी मागाहून आरक्षणे टाकलेली असतील ती उठली पाहिजेत असे श्री. नलावडे यांनी यावेळी सांगितले.
