ग्रामस्थांत भीतीचे वातावरण;हत्तीचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
आंबोली,ता.०९: येथील नांगरतास येथे एका टस्कर हत्तीने मोठ्या प्रमाणात धुडगुस घालून नुकसान केले. रात्रभर दहशत घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबोली नांगरतास येथे गेले काही दिवस एक मोठा टस्कर दहशत घालत आहे. ऊस शेती भात शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी गाड्या देखील मुख्य रस्त्यावर अडवतो त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. काल रात्री साधारण ११ च्या दरम्यान टस्कराने नांगरतास येथे अशोक गावडे व ओमकार गावडे यांच्या घराजवळ आणि तेथील शेतात धुडगुस घातला.दरवाजावर देखील सोंडेने थाप दिली.त्यानंतर त्यांची दुचाकी सोंडेने ओढत नेत त्यांच्या छोट्या हत्ती गाडीवर आपटली आणि दोन्ही गाड्या धकलीत नेल्या. बराच वेळ उसाची नुकसानी केली.त्यानंतर वाटेत धुमशान घालत तो नांगरतास येथील आणखी काहींच्या शेतात गेला.गेले काही दिवस या ठिकाणी हा हत्ती नुकसान करत आहे.रात्री या हत्तीने दहशत केल्याने श्री.गावडे यांच्या घरी भीतीचे वातावरण होते.यानंतर रात्री वनविभाग कर्मचारी याना बोलवल्यानंतर तासभराने त्या ठिकाणी पोचले रात्री ४ वाजेपर्यंत धुमशान घातले.गेले बरेच दिवस नांगरतास येथे बेळगाव सावंतवाडी रस्त्यावर हत्ती गाड्या अडवत आहे. तसेच गवसे तसेच त्या भागात ही असेच गाड्यांचे नुकसान करत आहे.हा हत्ती नुकसान कारक असल्याने कायम स्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तसेच शासकीय नुकसान भरपाई कमी मिळत असल्याने त्याबाबत पंचनामा करताना योग्य पद्धतीने करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
