उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांचे आश्वासन;बंदर निरीक्षक उमेश महाडिक यांची माहिती
मालवण दि प्रतिनिधी
मत्स्य विभागाच्या वेळ काढू धोरणाचा फायदा उठवीत गेले दोन महिने सिंधुदुर्गचा समुद्र आपल्याला आंदण मिळाल्यागत परराज्यातील पर्ससीन टॉलर्सनी घुसखोरी करीत समुद्रातील मासळी ओरबाडून नेण्याचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस मत्स्य विभागाची शीतल नावाची गस्ती नौका मालवणच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याच्या तात्पुरत्या कालावधीसाठी असणारी ही गस्ती नौका ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना खर्ची पडल्याने सप्टेंबरचे पुढील पंचवीस दिवस ही गस्ती नौका मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात कार्यरा होणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर पर्ससीन रोखण्यासाठी पंचवीस दिवसानंतर पुढे काय हा एक प्रश्नचिन्ह आहे
राज्यातील मच्छिमारी बंदी कालावधी संपुष्टात येण्या अगोदरच परराज्यातील पर्ससीन टॉलर्सने सिंधुदुर्गच्या समुद्रात विशेषतः मालवणच्या समुद्रात धुडगूस घालून मासळीची लूट केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तर मालवणच्या समुद्रात मच्छिमारी करणारे टॉलर किनाऱ्यावरून दिसत होते. परराज्यातील हायस्पीड टॉलर्सद्वारे होणारी बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी मच्छिमारांना उघड्या डोळ्यांनी पहावी लागली होती. मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका नसल्याने परराज्यातील टोलर्सना मालवणचा समुद्र आंदण देण्यात यावा अशा पद्धतीने टोलर्सची मच्छिमारी होत होती. मात्र, मत्स्य व्यवसाय विभागाकडून कागदी घोडे नाचविण्या व्यतिरिक्त ठोस कार्यवाही होत नव्हती.
१ ऑगस्ट हा राज्यातील मच्छिमारी हंगाम सुरू होण्याचा दिवस असतो म्हणजेच ३१ जुलै पर्यंत राज्यात मच्छिमारीस बंदी असते. अशावेळी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्यव्यवसाय विभागाला जाग आली व त्यांनी गस्ती नौकेबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मालवणच्या मत्स्यव्यवसाय विभागाला दिले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात गस्ती नौकेची निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना ही प्रक्रिया जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्यव्यवसायच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार केली गेल्याने तात्पुरत्या दोन महिन्यासाठी असणारी ही गस्ती नौका कार्यान्वित होण्यास सप्टेंबरचा दुसरा आठवडा उघडला. वस्तुतः ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यासाठी ही गस्ती नौका होती. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात व इतर बाबी पुर्ण करण्यासाठी ऑगस्ट महिना खर्ची झाला. त्यामुळे अखेरीस पाच सप्टेंबर पासून मालवणच्या समुद्रात गस्ती नौका कार्यरत झाली आहे.
सध्या या गस्तीनौकेवर एक परवाना अधिकारी, एक सुरक्षा रक्षक आणि बोटीवरील खलाशी या लोकांचा समावेश आहे मात्र, या गस्ती नौकेवर संरक्षणाच्या दृष्टीने जो पोलीस हवा तो पोलीस नसल्याने या गस्ती नौकेबाबत प्रश्न चिन्ह ठाकले आहे.
