⚡कणकवली ता.०६-: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक केले. त्यावेळी ते बोलत होते.
चित्रकार प्रकाश कब्रे हे शिरोडा येथील असून त्यांच्या चित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शने झालेली आहेत. या भेटीदरम्यान कब्रे यांनी ‘अक्षरोत्सव’ मध्ये असलेल्या सर्व संदेश पत्रांची पाहणी केली. अनेकांसोबतच्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी बोलताना कब्रे म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खरच आनंदाचा दिवस आहे. गेले किती दिवस अक्षरघराला भेट देण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. अक्षरघर या संकल्पनाही भन्नाट असल्याचे म्हणाले. यापूर्वी अनेकांनी या अक्षरघराला भेट देऊन या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे कौतुक केले आहे.
यावेळी चित्रकार प्रकाश कब्रे यांनी निकेत पावसकर यांच्या वाटचालीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अलीकडे निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला निशुल्क स्पर्धा परिक्षा व्याख्याते, मुंबई सिमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर, लालबाग येथील आनंदभूवन चे मेघनाथ शेट्टी, लेखक महेश काणेकर, बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट, लोकसत्ताचे वरिष्ठ क्रिडा प्रतिनिधी प्रशांत केणी आदिंनी भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत.
भारतीय पोस्ट कार्डवरच संदेश का?
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.
