नगर पालिकेच्या उपक्रमात सातत्य नसल्याने प्रश्न बनला गंभीर
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरात भटके कुत्रे आणि मोकाट गुरांचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी आणि गुरांचे कळप अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या व लहान मुलांच्या उरात धडकी भरत आहे. नगरपालिकेने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दोन तीन वेळा राबविलेल्या निर्बीजीकरणाच्या उपक्रमात कोणतेही सातत्य न ठेवल्याने या उपक्रमाचा कोणताही परिणाम कुत्र्यांच्या संख्येवर झालेला नाही. कुत्र्यांच्या संचाराची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत.
भटके कुत्रे आणि मोकाट गुरे ही मालवण शहराची गेले काही वर्षे डोकेदुखी ठरली आहे. शहरातील रस्त्या रस्त्यावर, गल्ली बोळात कुत्र्यांचा संचार वाढला असून झुंडीने असणाऱ्या या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रस्त्यावरून चालतानाही सावधगिरीने चालावे लागत आहे. या कुत्र्यांकडून नागरिकांचा तसेच लहान मुलांचा चावा घेतल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तर काही दुचाकीस्वारांच्या मागेही कुत्रे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र कुत्र्यांच्या उच्छादाची समस्या सोडविण्यास नगरपालिकेला नेहमी अपयश आले आहे. तीन वर्षांपूर्वी नगरपालिकेकडून कुत्रे निर्बिजीकरणाची मोहीम मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली होती. यासाठी नगरपालिकेच्या आवारात शस्त्रक्रिया केंद्र व कुत्रे ठेवण्यासाठी पिंजरे तयार करण्यात आले होते. मात्र हा उपक्रम दोन महिन्यातच बारगळला. त्यानंतर आडारी येथ कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या जागेत कुत्रे निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र त्याचेही काम रडत रखडत सुरू असून अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. मात्र कुत्र्यांची संख्या वाढल्याने नगरपालिकेने याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपावर दोन वेळा कुत्रे निर्बीजीकरण उपक्रम राबविला. मात्र या उपक्रमात कोणतेही सातत्य ठेवण्यात आलेले नसल्याने कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
तसेच शहरात मोकाट गुरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठ परिसरात या गुरांचा वावर मोठा असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या या गुरांमुळे वाहतूक कोंडी तसेच रात्रीच्या वेळी अपघातही घडत आहेत. अपघातामुळे वाहनचालक व गुरांच्या दुखापतीचा धोका उद्भवत आहे. तसेच या गुरांकडून बाजारपेठ भागात मलमूत्र विसर्जन होत असल्याने व्यापारी व दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. तर काही गुरे भाजी विक्रेत्यांचा भाजीपालाही खात असल्याने विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. गुरांच्या मालकांचे आपल्या गुरांवर कोणतेही लक्ष नसल्याने ही गुरे मोकाट फिरत आहेत. मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी असलेला नगरपालिकेचा कोंडवाडाही बंद अवस्थेत आहे. मोकाट गुरे पकडण्यासाठी देखील नगरपालिकेकडे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नाही. मोकाट गुरांच्या प्रश्नी नगरपालिकेने गुरे पकडून त्यांच्या मालकांवर कारवाई करणे महत्वाचे बनले आहे.
