भाजप प्रभारी विजय केनवडेकर यांची प्रसिध्दीपत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका…
मालवण (प्रतिनिधी)
आम.वैभव नाईक यांनी मोठा गाजावाजा करत आणलेल्या बीच क्लिनींग मशिनची अवस्था ही ‘ठेकेदार तुपाशी , जनता उपाशी’ अशीच असून या मशीनच्या बारा महिन्याच्या ठेक्यासाठी शासनाने दीड कोटी रुपये दिले असून यामुळे ठेकेदार मालामाल झाला आहे, यातून जनतेच्या पैशाला चुना लावण्यात आला असून केवळ आठ महिने चालणाऱ्या या मशीनचे लोकार्पण करणे म्हणजे जनतेला फसविण्यासारखे असल्याची टीका भाजपचे मालवण प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
दरम्यान, बिच क्लिनिंग मशिनची चौकशी करावी यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भाजपचे युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वस्तुस्थिती मांडून चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात येणार आहे, असेही विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.
बिच क्लिनिंग मशिन सिंधुदुर्गात दाखल झाल्यावर आमदार वैभव नाईक यांनी त्याचा शुभारंभ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकमेव बीच क्लिनिंग मशिन पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. उपलब्ध झालेली मशिन जे.सी.बी. मशीनचे आधुनिकीकरण केलेले मशिन आहे. बिच क्लिनिंग मशीनद्वारे वाळूतील कचरा गोळा करून एकत्र करून तो बाहेर पडला पाहिजे. अशी मशिन आवश्यक असताना आधुनिक मंगऱ्याने कचरा गोळा करणाचे मशिन उपलब्ध करून दिले आहे. या मशिनने ओल्या वाळूसह कचरा एकत्र होतो मात्र, विभाजन करणे कठीण होत असल्याने ‘भिक नको पण कुत्रे आवर’ अशी परिस्थिती झाली आहे. बिच क्लिनिंग मशिन व ऑपरेटिंगचा एक वर्षाचा ठेका कंपनीला दिला असून एक वर्षाने हि मशिन जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करावयाची आहे. बिच क्लिनिंग मशिनचा बारा महिन्याचा ठेका असला तरी पावसाळ्याचे चार महिने समुद्र किनारे बंद असतात त्यामुळे ही मशीन आठ महिनेच चालणार आहे मात्र या मशीनच्या बारा महिन्याच्या ठेक्यासाठी एक कोटी पन्नास लाख शासनाने दिले आहेत. यात ठेकेदार मालामाल झाला आहे. ७० ते ७५ लाख रुपयापर्यंत नविन बिच क्लिनिंग मशिनचा ऑपरेटींग व देखभालीचा ठेका देणे आवश्यक असताना हा ठेका दिड कोटी रुपयाला देणे म्हणजे जनतेचा पैशाला चुना लावल्या सारखा आहे. आमदारानी सर्व सुविधा उपलब्ध असणारी मशिनचा आग्रह का धरला नाही. एक वर्षा नंतर कोण मशिन ऑपरेट करणार हे जिल्हा प्रशासनालाच माहित नाही.
सिंधुदुर्गातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांना कचरा उचलण्यासाठी काय व्यवस्था करणार यासाठी नियोजन नाही. अशी स्थिती असताना लोकार्पण सोहळा करणे म्हणजे जनतेला फसवण्या सारखे आहे, अशी टीका विजय केनवडेकर यांनी केली आहे.
मालवण मधील नगरपालिकेला दिलेला अग्निशामक बंब “आमच्याकडे अग्निशामक आहे” हे सांगण्यापुरताच उपलब्ध केला आहे. शहरात हा अग्निशामक फिरू शकत नाही. नियोजन न करता फक्त श्रेय लाटण्यासाठीच शुभारंभ आमदार करणार का ? प्रशासनाला पाठीशी घालणारे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर जाब विचारणार का? नाहीतर मालवण बिच फेस्टीवल गाजावाजा करून घेत श्रेय घेऊन झाले, नंतर मुख्याधिकारी इंव्हेट अधिकारी झाले, अशी टिका करणारे माजी नगराध्यक्ष जाब विचार का ? असे सवालही विजय केनवडेकर यांनी उपस्थित केले आहेत.
