⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील नांदरुख गावास लाभलेले ऐतिहासिक महत्व आणि त्यादृष्टीने जोडलेल्या घटना, स्थळे, देवालये आणि पुढे घडलेला विकास यांचा मागोवा घेणारी कार्यशाळा संपन्न झाली. नांदरुख, ग्रामपंचायत, ग्रामसेवा संघ नांदरुख,’ शिवसृष्टी नांदरुख ‘ व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख अंबडोस येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मालवण शहर, देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, कातवड यांचा समावेश असलेल्या यापूर्वीच्या एकसंघ नांदरुख गावाचा “छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा इतिहास” नांदरुख या वनस्पती पासून गावास पडलेले नांदरुख हे नाव, प्रख्यात जागृत देवस्थान श्री गिरोबा व रम्य तलावा काठी वसलेले देव गिरोबा देवालय, गावातील १३४ वर्षांपूर्वीची शाळा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधते वेळी येथे वसवलेला तळ, त्याकाळात नांदरुख गावाला बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण म्हणून मिळालेली मान्यता, पुढील काळात मालवण शहर तथा आजूबाजूच्या गावांचा झालेला विकास या सर्व विषयांचा मागोवा घेत याविषयी माहिती देत चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्याकरता स्यमंतक संस्था धामापूरचे मोहम्मद शेख, यूट्यूब च्या “कोकणी राण माणूस चॅनलचे’ प्रसाद गावडे, आजगावकर आजी इको स्टोर” या अभिनव संकल्पनेचे प्रणेते रोहित आजगावकर हे विशेष उपस्थित होते. याप्रसंगी काशिनाथ चव्हाण, गोविंद चव्हाण, अनिल सुकाळी, दिलीप परब, अशोक शिंगारे, सुरेश चव्हाण, विजय चव्हाण, रावजी चव्हाण, सुहास परब, संतोष लुडबे, एकनाथ राणे, मनोज लुडबे, संदेश मालवणकर, सद्गुरु नामनाईक, विलास चव्हाण, जयवंत लुडबे, राहुल परब, अशोक बीरमोळे, अनिकेत भगत, प्रगती मुणगेकर यांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नांदरुख सरपंच दिनेश चव्हाण तर आभार प्रदर्शन अनिकेत भगत (आयआयटी मुंबई) यांनी केले.
