शुक्रवारची घटना: पेढ्यातून दिले गुंगीचे औषध
ओरोस ता.२७-:
रिक्षेत भाडे म्हणून बसलेल्या परप्रांतीय जोडप्याने पेढा व पाण्यातून गुंगीचे औषध देवून दोन सोन्याच्या चैन व रोख २३ हजार रुपये लुटत रिक्षेची चावी घेवून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. तळगाव काटापुरवाडी येथील राजेश सावंत असे रिक्षा चालकाचे नाव असून त्याने आज याबाबत जबाब सिंधुदुर्गनगरी पोलिसांना दिला आहे.
शुक्रवारी दुपारी सुकळवाड येथून भाडे राजेश सावंत यांच्या रिक्षेत बसून पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात हे जोडपे घेवून गेले होते. तेथे दर्शन घेवून आल्यावर रिक्षा चालक राजेश यांना प्रसाद म्हणून पेढा दिला. त्यानंतर प्यायला पाणी दिले. यामुळे कुडाळ भंगसाळ नदीच्या ब्रीज जवळ आल्यावर राजेश बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना काहीच आठवत नाही. परंतु ती रिक्षा हमरमळा येथे राजेश सावंत यांच्यासह आढळून आली. मात्र, त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैन व रोख २३ हजार रुपये तसेच रिक्षेची चावी गायब झाली असून प्रवाशी म्हणून बसलेले ते जोडपे व त्यांच्या सोबत असलेली लहान मुलगी गायब आहे, असे राजेश सावंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
