मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची माहिती
मालवण दि प्रतिनिधी
पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरात कचऱ्याची समस्या वाढत असून समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याचे वाढते प्रमाण हा गंभीर विषय बनला असल्याने मालवण नगरपरिषदेकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी करून उपलब्ध केलेली बीच क्लिनिंग मशीन आज मालवण नगरपालिका आवारात दाखल झाली. सुमारे दीड कोटी रुपयांची ही मशीन असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी दिली आहे. या मशीनद्वारे मालवणच्या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता कशा पद्धतीने होते, याद्वारे किनारे चकाचक होणार का याकडे मालवणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, या बीच क्लिनिंग मशीनचे उद्या दि. २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी येथे आम. वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण होणार अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिली आहे.
मालवणात वाढत्या पर्यटनाबरोबर येथील किनारपट्टीवर सध्या प्लास्टिक, रबर, काच आणि अन्य प्रकारच्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. किनाऱ्यांवर ठिकठिकाणी या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून मानवी प्रयत्नांनी हा कचरा साफ करणे मुश्किल बनले आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध करण्यासाठी मालवण नगरपालिका व आम. वैभव नाईक यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मालवण नगरपालिकेला बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध झाली असून ही मशीन आज नगरपालिका आवारात दाखल झाली.
या मशीनची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असून मशीनची पूर्णपणे जोडणी व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर ही मशीन किनाऱ्यावर सेवेत दाखल होणार आहे. या मशीनच्या पुढील भागात लावलेली चाळण किनाऱ्यावरील वाळूत फिरल्यावर या चाळणीतून वाळू अलग होऊन कचरा मशीन मध्ये जमा होणार आहे. यात प्लास्टिक बॉटल्स व इतर प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल आणि वस्तू तसेच इतर प्रकारचा कचरा गोळा केला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली आहे. या मशीनचे उद्या २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आम. वैभव नाईक यांच्या हस्ते बंदर जेटी येथे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महेश कांदळगावकर व मंदार केणी यांनी दिली आहे.
