सागरी महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन

भाजयुमोचा सार्वजनिक बांधकाम विभागास इशारा

⚡मालवण ता.२६-: मालवण शहरातील सागरी महामार्गावरील देऊळवाडा ते कोळंबपूल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये धडक देत निवेदन देत सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याची पाहणी करण्यास भाग पाडले. गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी यावेळी दिला.

यावेळी ललित चव्हाण यांच्यासह महेंद्र पारकर, निनाद बादेकर आदी उपस्थित होते. देऊळवाडा ते कोळंब पूल या सागरी महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे अपघात घडत आहेत. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही लक्ष दिलेले नसून खड्ड्यांमुळे कोणाचा अपघात घडल्यास त्याचे सा. बां. विभागास कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे, अशी टीका यावेळी ललित चव्हाण यांनी केली. सागरी महामार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्यात यावेत अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ललित चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदारास दिला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गणेश चतुर्थी अगोदर देऊळवाडा ते कोळंब पूल या सागरी मार्गावरील रस्ते बुजविण्यात येतील, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले.

You cannot copy content of this page