⚡मालवण ता.२६-: भाजपचे दत्ता सामंत हे निवडणुका जवळ आल्यानंतर ‘टाक खडी, माग मत’ हा अजेंडा वापरून दिशाभूल करतात. मात्र आता जनता ही सामंत यांच्या भूलथापांना कधीही बळी पडणार नाही. सामंतांनी आपला टाक खडी , माग मत हा अजेंडा आता बंद करावा, अशी जहरी टीका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालवण शिवसेना शाखेत हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
देवबाग येथील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु देवबाग येथे जाऊन फोटोग्राफी करायची व तो रस्ता मीच केला असा भासवायाचा हे दत्ता सामंत यांचे वर्तन चुकीचे आहे. देवबाग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी आम्हीही केली होती. परंतु त्याबाबत आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही. एसआर फंडातून रस्त्याला ५० लाख रूपये मंजूर झाले होते. चार वेळा निविदा प्रसिद्ध होऊन देखील काही अपप्रवृत्तीच्या माणसांमुळे कोणताही ठेकेदार या कामासाठी इच्छुक नव्हता. परंतु आमदारांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या कामांना आता सुरूवात झाली आहे. देवबाग रस्त्यासह परिसरातील अन्य रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ३ कोटीचा निधी आणण्यात यश आले. देवबाग येथील रस्ता चांगल्या पद्धतीने झाला आहे. आवश्यक त्या ठिकाणी क्राँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु दत्ता सामंत यांनी ठेकेदार म्हणून घेतलेली कामे अपूर्ण आहेत. बेळणा रस्ता, पेंडूर रस्ता, मुख्यमंत्री सडक योजना, शहरातील रस्त्यांची ५० लाख रूपयांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे दत्ता सामंत यांनी केवळ फुशारक्या न मारता त्यांनी रस्त्याची कामे अपूर्ण का ठेवली ? याचे उत्तर जनतेला द्यावे. सामंत यांनी घेतलेली रस्ते दुरुस्तीची कामे अपूर्ण ठेवून आमदार व खासदार यांची ते बदनामी करत आहेत . सामंत यांच्यामध्ये रस्ता दुरुस्तीची कामे करण्याची कुवत नसेल किंवा त्यांच्याकडून कामे पूर्ण होत नसतील तर त्यांनी अशी कामे घेवू नयेत, असा सल्ला देत खोबरेकर यांनी येत्या काळात ही कामे पूर्ण न केल्यास तुमच्या वक्तव्यानुसार येथील जनताच तुमचा सत्कार करेल अशी टीकाही केली. ते पुढे म्हणाले, शिवसैनिकांनी काही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे यापुढे तुमच्या उत्तराला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही खोबरेकर यांनी यावेळी दिला.
खोबरेकर पुढे म्हणाले निलेश राणे यांनी तळाशील बंधाऱ्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी देणार असे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते त्याचे काय झाले? आमदारांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून देवबाग, तळाशील येथील बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. मात्र देवबाग येथे वाजत गाजत केलेल्या बंधाऱ्याच्या उदघाटनाच्या ठिकाणी एकही दगड पडलेला नाही. आता तुमची सत्ता येऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला तरी ही कामे का सुरू झाली नाहीत. यावरून शिंदे भाजप सरकारकडे तुमची काय किंमत आहे हे दिसून येत असल्याची टीकाही श्री. खोबरेकर यांनी केली.
