एकल व विधवा महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन

मालवण (प्रतिनिधी)

एकल व विधवा महिला या स्वतःच त्यांच्या कुटुंबाच्या प्रमुख असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते. ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी महिलांना आपले आरोग्यही चांगले ठेवणे गरजेचे आहे. एकल व विधवा महिलांसाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा लाभ महिलांनी घेऊन आपले जीवन सुखकर बनवावे असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले.

तहसील कार्यालय व एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ मधील एकल / विधवा लाभ एकाच दिवशी एकाच छताखाली मिळवून देण्याकरिता ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत शिबिर एक लाभ अनेक हे शिबिर आज मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडले. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ- पराडकर, पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी संजय जाधव, सुनील मोटे, प्रशांत पाटील, नितीन काळे, दिपिका सावंत, उल्का खोत, वर्षा परब आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रत्येक विभागाच्या प्रमुखाने आपल्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना समजावून दिली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे म्हणाले, एकाच दिवशी एका छताखाली या सर्व योजनांचा आपल्याला लाभ व्हावा यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावोगावी असणारे अडीअडचणी यांची माहिती गोळा करण्यात आली व कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा विचार करून हे शिबीर घेण्यात आले. संजय गांधी योजना विभागामार्फत ज्या योजना राबविल्या जातात. आतापर्यंत आपल्याला पात्र लाभार्थी सापडले त्यापैकी २३ लाभार्थ्यांना आपण पेन्शन सुविधा सुरू केली आहे. त्याच बरोबर केंद्र शासनाची योजना आहे. त्यामध्येही दोन लाभार्थी पात्र होते, त्यांना देखील एकाच वेळेस वीस हजार रुपयाची मदत दिलेली आहे. आरोग्य विभागाचे पथक देखील याठिकाणी ठेवण्यात आले आहे. आज याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी तपासणी करावी जेणेकरून आपले शरीर सुदृढ राहील आणि आपल्या आरोग्या विषयीची माहिती मिळेल. याठिकाणी ज्या शेतकरी महिला आहेत त्यांनी कृषी विभागाचा लाभ घ्यावा, असेही यावेळी तहसीलदार पाटणे म्हणाले.

यावेळी गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर म्हणाले, कुटुंब प्रमुख जे काम करत होता ते काम आता तुम्हा महिलांना करावे लागणार आहे. याठिकाणी प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली आहे तरी सर्व महिलांनी येथील स्टॉलना भेट देऊन आवश्यक माहिती व योजनांचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page