कामांबाबत तक्रार करूनही मालवण न.प. कडून बिले अदा

महेश कांदळगावकर;आमदार खासदार यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा

⚡मालवण ता.२५-: मालवण शहरात नगरपालिकेने केलेल्या पावसाळी गटार सफाई बाबत असंख्य तक्रारी असल्याने या बाबत आपण लेखी तक्रार करून त्या ठेकेदाराला कामाचे बिल अदा करू नये असे कळवूनही नगरपालिकेकडून बिल अदा केले गेले तसेच बिलाची रक्कम मिळाल्यानंतर तो कंत्राटदार अर्धवट काम टाकून पळून गेला. त्याचबरोबर नगरपालिकेच्या अग्निशमन बिल्डींगच्या कामाबाबतही तक्रार देऊन निकृष्ट दर्जाचे झालेले काम सुधारून घेऊनच त्या नंतर ठेकेदाराला बिल अदा करण्याबाबत सूचना करूनही प्रशासनाने ठेकेदाराचे रनिंग बिल अदा केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी करत मालवण नगरपालिकेच्या अशा विविध कामांबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत असून याबाबत खासदार आणि आमदार यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती कांदळगावकर यांनी दिली आहे.

मालवण शहरात गटार सफाई कामाच्या अदा केलेल्या बिलाची माहिती मिळावी म्हणून महिन्या पूर्वी अर्ज करूनही अद्याप माहिती दिली गेलेली नाही, त्याचप्रमाणे याच ठेकेदाराने कचरा संकलन टेंडर घेतल्याने त्याचे टेंडर रद्द करणे बाबत सूचना करूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे. तसेच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बिल्डींगचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही ठेकेदाराला रनिंग बिल अदा केले गेले आहे. अनेक चुकीच्या कामाबाबत ठेकेदार यांच्या वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करूनही अद्याप या बाबत नगरपालिकेने ठोस कार्यवाही केल्याचे अवगत नाही, असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

मुख्य अधिकारी आणि प्रशासक या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्ती कडे असल्याने कोणाचाही अंकुश नसल्याने अशाप्रकारची कामे न.प. मध्ये सुरू आहेत. महोत्सवासारखे इव्हेंट ज्या पद्धतीने नियोजित केले गेले, जी तत्परता दाखविली तीच तत्परता न.प. च्या दैनदीन कामकाजात दिसून येत नाही. आमचा कार्यकाळ जरी संपला असला तरी निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधी येईपर्यंत लोकांची काम करणे ही आमची नैतिकता आहे अस आम्ही मानतो. त्यामुळे न.प. च्या अश्या प्रकारच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त आहेत. याबाबत आमच्या आमदार , खासदार यांच्या कडे आवश्यक माहिती सह तक्रार दाखल करणार आहे, असेही महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page