मालवण शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू

⚡मालवण ता.२४-:
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम हाती घेतले असून नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व रान काढून सफाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळ्यात मालवण शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडी व रान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गणेशोत्सवापूर्वी ही झाडी तोडण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. तसेच याबाबत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व भाजप पदाधिकाऱ्यांनीही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन झाडी तोडण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नागरपालिकेने कार्य तत्परता दाखवत रस्त्यालगतची झाडी तोडण्याचे काम हाती घेतले असून शहरात विविध ठिकाणी हे काम सुरू आहे. तसेच मालवण शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने डास निर्मूलनासाठी डास प्रतिबंधक औषध फवारणी देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

शहर स्वच्छता व इतर तक्रार निवारणासाठी मालवण नगरपालिकेची व्हॉट्सअप हेल्पलाईनही कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांनी ९४०५५७७४३१ या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे तसेच १८००-२३३-४३८१ या टोल फ्री नंबर वर फोन करून तक्रार नोंदणी करावी, असे आवाहन नागरपालिकेमार्फत करण्यात आले आहे

You cannot copy content of this page