ओरोस ता.२४
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संबंधाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून विधिमंडळात शिक्षकांचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जाहीर निषेध करीत आहे, असे राज्यशिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य सरचिटणीस विजय कोंबे आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यावेळी शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग शाखेसह राज्यातील सर्व जिल्हा शाखांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. शिक्षक मुख्यालयी राहत नाही म्हणून राज्यातील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था झाली आहे, अशा प्रकारचे वक्तव्य करतानाच अर्थहीन आणि चुकीचे मुद्दे मांडून शिक्षकांचा अवमान आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांसाठी सर्वप्रथम शासकीय निवासस्थानांची सुविधा शासनाने निर्माण करून दिली पाहिजे. त्यानंतरच शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत आग्रह धरणे योग्य राहील. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्यासाठी निवासाची सोय तर दूरच परंतु राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरवस्था सुद्धा आमदार प्रशांत बंब लक्षात घेणे गरजेचे आहे, असे प्रसिध्दी पत्रकार नमूद केले आहे.
