शहरातील गणेश चतुर्थी नियोजन बैठक संपन्न

⚡वेंगुर्ला ता.२४-: गणेश चतुर्थीच्या शहरातील नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत चारचाकी, तीनचाकी, मालवाहक तीन चाकी, दुचाकी आदी गाड्यांचे पार्किग यांच्या नियोजनाबरोबरच २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर पर्यंत एसटीचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिरजवळ करण्यात यावा अशा सूचना एसटी महामंडळाने आपल्या सर्व वाहन चालकांना द्याव्यात असे ठरविण्यात आले.

  गणेश चतुर्थी पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातील नियोजनाची सभा २३ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला तहसिल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, महाराष्ट्र वीज वितरणचे प्रतिनिधी, वेंगुर्ला आगाराचे कर्मचारी, व्यापारी संघटना व रिक्षा संघटना यांचे प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी, नगरपरिषद कर्मचारी व इतर नागरिक उपस्थित होते.

  यावेळी झालेला चर्चेत गणेश कॉम्प्लेक्स, माणिकचौक, शाळा नं.१, सिद्धीविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, बाबासाहेब पाटील यांच्या नियोजित इमारती नजिक मोकळ्या जागी, लता अपार्टमेंट, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरील मोकळी जागा येथे चारचाकी पार्किग, वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर येथे तिनचाकी पार्किग, कुबलवाडा, सप्तसागर ते मारुती मंदिर मालवाहक तीनचाकी, सागररत्न मत्स्यबाजारपेठ, पवनपूत्र भाजी मंडई, लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल इमारतीचा तळमजला, वेंगुर्लेकरवाडी, सप्तसागर, रामेश्वर मंदिर येथे दुचाकी पार्किग करण्याचे ठरविण्यात आले आहे. तशाप्रकारचे फलक संबंधित ठिकाणी लावण्याबरोबरच प्रत्येक पार्किगच्या ठिकाणी पोलिस कर्मचारीही ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये शहरात वाहतुक व इतर गोष्टींचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला मदत करणा-या इच्छुक स्वयंसेवकांनी प्रशासनाशी संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  दि.२८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर कालावधीमध्ये अवजड वाहनांनी हॉस्पिटल नाका, कॅम्प, बॅ.नाथ पै रोड मार्गे वाहतूक करावी. मारुती मंदिर कडून बाजारपेठेकडे जाणा-या रस्त्यावर फक्त दुचाकी गाड्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दि.२९ व ३० ऑगस्ट पर्यंत माटवीचे साहित्य विक्री करणा-या किरकोळ व्यापा-यांना रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात येणार आहे. हे दोन दिवस वगळून रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठ एक दिशा मार्ग चालू राहील. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर बाजारपेठेतून चारचाकी वाहतूकीला परवानगी दिली आहे. बाजारपेठेतील व्यापा-यांच्या माल वाहतुक करणा-या गाड्यांनी दि. २८ ऑगस्ट ते दि.९ सप्टेंबरपर्यंत रात्रौ ९ ते ५ या वेळेत तसेच इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेतच नगरपरिषदेने ठरविलेल्या सागररत्न मत्स्यबाजारपेठ येथील मोकळ्या जागेत पार्किग करावे.

  सार्वजनिक बांधकाम विभागाने व नगरपरिषदेने आपल्या ताब्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवाव्यात अशा सूचना करण्यात आल्या. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने गणेश चतुर्थीच्या काळात लोडशेडींग करु नये, शहरातील विद्युत वाहिनीवरील  आलेल्या फांद्या तोडून घ्याव्यात. नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व गणपती विसर्जनाच्या ठिकाणी असलेली झाडी तोडून साफसफाई करावी, शुभेच्छा बॅनर लावणा-यांनी नगरपरिषदेच्या परवानगीने व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. शुभेच्छा तसेच व्यावसायीक जाहिरातींकरीता न.प.ने ठिकठिकाणी लावलेल्या स्क्रीनचा वापर करावा, न.प.ने गणेशोत्सव कालावधीत अग्निशमन बंब सुसज्ज ठेवावा, गणेश विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश व नगरपरिषद कर्मचा-यांची नियुक्ती करावी,  सण साजरा करताना कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टीकच्या वस्तूंचा वापर करु नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page