हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान…

नुकसानग्रस्त मच्छीमाराना शासनाने द्यावी नुकसान भरपाई…

मालवण दि (प्रतिनिधी)

मालवणसह जिल्ह्याच्या हद्दीतील समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी अतिक्रमण केल्याने स्थानिक मच्छीमार मेटाकुटीस आले आहेत. या हायस्पीड ट्रॉलर्सनी तळाशील येथील संजय केळुसकर आणि दांडी येथील अर्जुन धुरी यांची जाळी तोडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. तर दुसरीकडे या ट्रॉलर्सकडून मासळीची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याने स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली असून मालवणच्या मच्छी बाजारात माशांचे भाव कडाडल्याचे चित्र आहे.

मच्छीमारी हंगाम सुरू होऊन २० दिवस उलटले असताना परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी जिल्ह्याच्या समुद्रात घुसखोरी करून एलईडी लाईट व पर्ससीन जाळी द्वारे अतिरेकी मासेमारी सुरू केली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका अद्यापही कार्यान्वित झालेली नसल्याने या ट्रॉलर्सना रान मोकळे झाले आहे. या अतिक्रमणामुळे स्थानिक मच्छीमारांचे जगणे मुश्कील केले आहे. या ट्रॉलर्सकडून स्थानिक मच्छीमारांच्या मासेमारी जाळी तोडण्याचे प्रकारही होत आहेत. तळाशील येथील संजय केळुसकर यांची नौका गिलनेट प्रकारातील न्हैय मासेमारीसाठी गेली असताना त्यांची चार जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडली. तर दांडी येथील अर्जुन धुरी रविवारी पहाटे बांगडे पकडण्यासाठी मासेमारीस गेले असताना त्यांची पाच जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडली. ऐन मत्स्य हंगामाच्या प्रारंभीच जाळ्यांचे नुकसान झाल्याने मच्छिमारांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. शासनाने दोन्ही मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, हायस्पीड ट्रॉलर्स कडून अतिरेकी मासेमारीद्वारे मासळीची लूट होत असल्याने स्थानिक मच्छीमारांना मच्छी मिळेनाशी झाली आहे. यामुळे मालवणच्या मच्छी बाजारात माशांचे भाव कडाडले आहेत. बांगड्यांचा दर टोपलीमागे सोळाशे रुपयांवर पोहचला आहे. तर बांगड्याचा वाटा ५ बांगडे २०० रुपये एवढा महाग होता. मोरी ४०० रुपये ते साडे तीनशे रुपये किलो होती. सुरमईची आवकही कमी झाल्याने सुरमई प्रतिकिलो १ हजार रुपये किलो एवढी महाग झाली आहे.

You cannot copy content of this page