युवाईने रक्ताचे पाणी करणाऱ्यांना विसरू नये

प्रा. रुपेश पाटील;माणगाव येथे गुणवंतांचा सत्कार*

⚡सावंतवाडी ता.२२ : आजच्या काळात आई, वडील आणि गुरु हेच आपले सर्वोच्च शुभचिंतक आहेत. त्यामुळे युवकांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी नेहमी या तीनही मार्गदर्शकांना नतमस्तक व्हावे, अलीकडे युवाई सोशल मीडियाच्या आहारी जात आहे, असे न करता आपल्याला कोणत्या क्षेत्रात वाव आहे ते स्वतः ओळखून, स्वतःच्या क्षमता सिद्ध करीत असताना आपल्या आई-बाबांचा सन्मान कसा आवडेल? याचा विचार करुन योग्य पद्धतीने प्रयत्न करावेत, निश्चितच माणगावसारख्या पुण्यभूमी असलेल्या क्षेत्रात तुम्ही एक भूमीपुत्र म्हणून मोठे काम करण्यासाठी सज्ज व्हा. जीवनात विधायक दिशा प्राप्त केल्यानंतर तुम्हाला यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी माणगाव (तालुका कुडाळ) येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा माणगाव व महिला बचत गटाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार प्रा. रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. पाटील यांनी व्याख्यान गुंफले. कार्यक्रमाला माणगावचे उपसरपंच दत्ता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नानचे, मनीषा कदम, रवींद्र जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा सरचिटणीस पं. ध. माणगावकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माणगाव येथील इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पेन, पुष्प व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. दिवंगत रामदास कदम यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांतर्फे गुणवंतांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

आपल्या व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, आता मूलभूत गरजांमध्ये बदल झाला असून मोबाईलचे स्थान अग्रणी झाले आहे. पण त्याचा उपयोग सकारात्मकदृष्टीने अपवादात्मकच केला जातो. आजची युवा पिढी तासन तास विनाकारण निव्वळ टाईमपास व मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर करते आहे. एक वेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल पण मोबाईल चार्ज असला पाहिजे, इतकी ही पिढी मोबाईलच्या आहारी जात आहे. मात्र याचे धोके मोठे आहेत. युवा पिढीने मोबाईलमध्ये गुंतण्यापेक्षा पुस्तकांमध्ये स्वतःला गुंतवावे. मोबाईलचा नाद सोडून ग्रंथालयाची कास धरावी. वैचारिक ग्रंथ वाचून आपले मस्तक सशक्त करावे. असे सांगत पालकांनीही आपली मुले नेमकी काय करत आहेत?, कुठे जात आहेत? याचा शोध घेतला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास उपस्थितीत असलेले माणगावचे उपसरपंच दत्ता कोरगावकर यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले युवकांनी दुसऱ्यांचे नोकर होण्यापेक्षा स्वतः उद्योगातून उभारी घेऊन मालक बनावे. स्वतःच्या पायावर उभे राहत अनेकांना नोकरी व रोजगार देणारा व्यावसायिक बनून आदर्श निर्माण करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक धनंजय कदम यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र जाधव यांनी केले. यावेळी प्रा. मिलिंद कदम, अंकिता कदम, गौतमी कांबळे, स्वप्नाली कदम, विनया कदम, सीमा जाधव, संध्या जाधव, वेदांती कदम, संध्या कदम, अरुणा कदम, अन्विता कदम, स्नेहा कदम, प्रभाकर कदम, संतोष कदम, लक्ष्मण कदम यांसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page