गुळदुवे वाचनालय अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा हेमंत मराठे यांच्याहस्ते शुभारंभ

मळेवाड — ज्ञानदीप वाचनालय,गुळदुवे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे हेमंत मराठे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश धर्णे यांनी केले तर स्वागत संस्थेचे अध्यक्ष फटू धर्णे यांनी केले.
कार्यवाह अरूण धर्णे यांनी ज्ञानदीप वाचनालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास, केलेले कार्यक्रम/उपक्रम यांची माहिती दिली तसेच वाचनालय कार्यकारिणीत आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी सहभागी होऊन सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रकला स्पर्धेत एकूण ५०विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यापूर्वी घेतलेल्या निबंधलेखन स्पर्धेची बक्षिसे यावेळी देण्यात आली.गुळदुवे गावातून मार्च २०२२ च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात ते म्हणाले की एखादी संस्था सुरू करणे सोपे असते मात्र सातत्य राखून ती सांभाळणे कठीण असते.गुळदुवे या छोट्याशा गावाने वाचनालयाचा सांस्कृतिक ठेवा सांभाळला आहे याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. वाचनालयाच्या स्वत:च्या इमारतीच्या बांधकामाकरिता आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करून शासकीय मदत मिळवून देईन याची त्यांनी ग्वाही दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिलेली गावातील सर्वात ज्येष्ठ वयोवृध्द व्यक्ती श्री.राघोबा दत्ताराम शेटकर ऊर्फ नाना शेटकर यांचा शाल,श्रीफळ व धोतरपान देऊन वाचनालयाचे अध्यक्ष श्री.फटू नारायण धर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाने झाली.ग्रामस्थां कडूनही यावेळी सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गोडधोड वाटप,मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
वाचनालय घेत असलेले मुलांचे कार्यक्रम, स्पर्धा यांच्या आयोजनाकरिता शिक्षणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपली मदत दिली.या कार्यक्रमाला वाचनालय कार्यकारिणी सदस्य, कर्मचारी, शिक्षक,ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी,महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
शेवटी अरूण धर्णे यांनी उपस्थितांचे,देणगीदारांचे, सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page