स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा ग्रामीण भागातही जल्लोष

रोणापालमध्ये घरोघर तिरंगा उपक्रमास प्रतिसाद : सरपंच सुरेश गावडे यांचे सुयोग्य नियोजन

⚡बांदा ता.१८-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही प्रचंड जल्लोष दिसून आला. रोणापालमध्ये सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार, शेतकरी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ७५ ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा प्रभात फेरी व इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांनी साजरा केला. केंद्र सरकारच्या ‘घर-घर तिरंगा’ या आवाहनानुसार गावात शंभर टक्के ग्रामस्थांनी आपापल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट असे सलग तीन दिवस राष्ट्रध्वज फडकवल्याची माहिती रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिली. तसेच अंगणवाडीत बालगोपालांची पंगतही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दहा दिवस नियोजनपूर्व कार्यक्रमास ग्रामस्थांची उपस्थिती मोठी होती. दहा रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, माऊली मंदिर परिसर, जिल्हा परिषद दवाखाना, ख्रिश्चनवाडी चर्च परिसराची सरपंच व कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत गावातील ग्रामस्थांनी विशेषकरून महिलांनी साफसफाई केली. दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने अंगणवाडीमध्ये गोपाळ पंगत ठेवण्यात आली होती. यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याहस्ते सकस आहार देण्यात आला तर संपूर्ण गावाबद्दलची माहिती माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी दिली. बारा रोजी मोबाइल अतिवापराच्या दुष्परिणामाबाबत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आणि सेंद्रिय शेतीबाबत सावंतवाडी तालुका माजी कृषी अधिकारी काका परब, निवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री.राऊळ यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ 60 ते 70 ग्रामस्थांनी घेतला.
तेरा रोजी सर्व शासकीय इमारत आवारात झेंडावंदन करण्यात आले. हर घर तिरंगा याबाबत आढावा घेत गावात शंभर टक्के घरांवर तिरंगा फडकला, झेंडावंदन झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळा कर्मचारी आणि विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आणि दयासागर छात्रालयातील मुले व ग्रामस्थांनी प्रभात फेरी काढली. चौदा रोजी आरोग्य पर्यवेक्षक श्री. म्हापणकर यांनी ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना साथरोग विषयी माहिती दिली. यावेळी सीएचओ तेजस्विनी माजगावकर व परिचारिका श्रीमती रंगसूर उपस्थित होते.
पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करून शाळेतील मुलांचे विविध सांस्कृतिक, वक्तृत्व स्पर्धा, निबंध व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आले. त्यांना प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. सोळा रोजी एसएसपीएम लाईफ टाईम रुग्णालय पडवे, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग व रोणापाल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचा 72 जणांचा लाभ घेतला. सतरा रोजी रोणापाल ग्रामपंचायतीच्यावतीने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांचा दयासागर छात्रालय येथे सत्कार करण्यात आला. तसेच गावातील निराधारांना ग्रामपंचायतमार्फत वस्तुरूपात मदत करण्यात आली.
आठ ते सतरा रोजी असे दहा दिवस ज्या ज्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी संपूर्ण कार्यक्रम करण्यास यशस्वी होण्यासाठी मदत केली त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचाही मान राखण्यात आला. तसेच सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान सांगता कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, ऑल इंडिया मोमेंटपर सेवाच्या संचालिका परमपूज्य माताजी, शेतकरी फळ बागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्गचे अध्यक्ष विलास सावंत, सावंतवाडी पंचायत समिती माजी उपसभापती संदीप नेमळेकर, मडुरा हायस्कूल मुख्याध्यापक दशरथ घाडी, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, सावंतवाडी गटविकास अधिकारी प्रतिनिधी श्री.गावीत, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे, माजी सरपंच उदय देऊलकर तसेच विद्यमान सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना गोठोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, निगुडे तलाठी भाग्यशीला शिंदे उपस्थित होते. तसेच बांदा सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांचेसुद्धा सहकार्य लाभल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व ग्रामस्थांचे ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी आभार मानले.

कर्मचारी रुग्णालयात असल्याची खंत!

रोणापाल ग्रामपंचायत कर्मचारी बाळू देऊलकर महोत्सवादरम्यान आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे श्री.देऊलकर अमृतमहोत्सवी कार्यक्रमात नसल्याची खंत सरपंच सुरेश गावडे यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page