खरात यांना हाताशी धरून आम. नाईक व संदेश पारकर यांचे राणेंच्या बदनामीचे कारस्थान

नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा टोला

⚡कणकवली ता.१७-: आम. वैभव नाईक आणि शिवसेनेचे संदेश पारकर यांनी खरात यांना हाताशी धरून राणेंच्या बदनामीचे कारस्थान रचले आहे.महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेला उमेदचा व्यवस्थापक शिवाजी खरात यांना आम. नितेश राणे यांनी कोणतीही मारहाण केलेली नाही. तसेच खरात यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आपणास आम. नितेश राणेंकडून कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे खरात यांनी स्वतःच नमूद केले आहे. आम.नितेश राणे यांना बदनाम करण्यासाठी आम. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी खरात याना आमदार राणेंवर खोटे आरोप करायला लावले. असा आरोप कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषद कणकवली येथे केला.

कणकवली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेऊन संदेश पारकर यांनी केलेल्‍या आरोपांचा समाचार नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतला.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण,महेश सावंत,बंडू गांगण
आदी उपस्थित होते.

समीर नलावडे म्‍हणाले, आम. नितेश राणे हे नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्यावर खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्‍या आहेत. देवगड येथील उमेद प्रकल्‍पात काम करणाऱ्या महिलेवर अन्याय झाला म्‍हणून तो प्रश्‍न सोडविण्यासाठी आम. नितेश राणे तेथे गेले होते. तेथेही त्‍यांनी सामोपचाराने प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्‍न केला. शिवाजी खरात याना कसलीही मारहाण केली नाही. तसेच खरात यानीही आपल्‍या पहिल्‍या तक्रारीत राणेंनी मारहाण केली असे कुठेही नमूद केलेले नाही. समीर नलावडे म्‍हणाले, आमदार नितेश राणे यांना बदनाम करण्यासाठी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी खरात याला आमदार राणेंवर खोटे आरोप करायला लावले. मात्र पोलीस तपासात सत्‍य काय ते निश्‍चितपणे बाहेर येईल.

नगराध्यक्ष समीर नलावडे म्‍हणाले, खरात हे शासकीय सेवेतील कायमस्वरूपी कर्मचारी नाही. तर कॉन्ट्रॅक्‍ट बेसिसवरील कर्मचारी आहे. त्‍यानी यापूर्वी कणकवली कृषी विभागात कंत्राटी पद्धतीवर काम केले होते. मात्र येथे काम करत असतानाही असेच उपद्‌व्याप करण्यात आल्‍याने त्‍याना सेवेत कायम केलेले नाही. त्याचप्रमाणे उमेद प्रकल्‍प व्यवस्थापक म्‍हणून काम करतानाही खरात यानी हाताखालील कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिलेली नाही. त्‍याबाबतच्या ऑडिओ क्‍लिप आमच्याकडे आहेत,वेळ आल्‍यास त्या आम्‍ही जाहीर करणार आहोत. दरम्‍यान आम.वैभव नाईक यांनी तर कुडाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना धक्‍काबुक्‍की केली होती. त्‍याचप्रमाणे संदेश पारकर यांनीही कणकवलीत पोलीस अधिकाऱ्याच्या कॉलरला हात घातला होता. त्‍यामुळे त्‍यांनी विनाकारण आमदार नीतेश राणेंवर आरोप करू नयेत.असे समीर नलावडे म्हणाले.

You cannot copy content of this page