आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू:संदेश पारकर

विनयभंगाच्या आरोपात दोषी आढळल्यास खरात यांच्यावरही कारवाई करावी

⚡कणकवली ता.१७-: आमदार नितेश राणे हे गुन्हेगारी विश्वातले महामेरू आहेत. वारंवार असे गुन्हे त्यांनी केले आहेत. काही गुन्ह्यांत ते जामिनावर सुटले आहेत. तो जामीन रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिला आहे. तसेच शिवाजी खरात यांच्यावर असलेल्या विनयभंगाच्या आरोपाची चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असेही पारकर यांनी स्पष्ट केले.

देवगड येथे उमेदचे व्यवस्थापक शिवाजी खरात यांना रानभाजी कार्यक्रम महोत्सवाच्या वेळी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या अंगरक्षकांनी तसेच राणे समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.या पाशर्वभूमीवर कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदेश पारकर बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, हर्षद गावडे, देवगड शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जोगेश राणे, सचिन आचरेकर, सिद्धेश राणे ,राजू राठोड व इतर उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले,डंपर आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर राणे यांनी असाच हल्ला केला होता. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आल्यामुळे ३५३ कलम लागले होते. मत्स्य अधिकाऱ्यांवर केलेली बांगडा फेक, हायवेच्या शाखा अभियंत्यांवरील चिखल फेक अशा अनेक कृत्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. राणेंच्या अशा वागणुकीमुळे कणकवली मतदारसंघ म्हणजे गुन्हेगारी मतदारसंघ अशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिमा तयार झाली आहे. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्याच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा, ही शिवसेनेची मागणी आहे. शिवाजी खरात हे अनुसूचित जमातीतील असल्याने त्यांच्यावर राणेंनी हल्ला केला आहे. राणे हे सराईत गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर हल्ला केला तरी माझे कोणी वाकडं करू शकत नाही ही त्यांची वृत्ती आहे. अशाप्रकारे जर अत्याचार होत असतील, आणि त्यांची तक्रार पोलीस नोंद करत नसतील तर अस्ट्रोसिटीखाली त्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि आता शिवाजी खरात यांच्यावरील झालेला हल्ला हे वैयक्तिक वैमनस्यातून झालेले आहेत. शिवाजी खरात यांच्या जीवितालाही धोका आहे. त्यामुळे खरात यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आपण पोलिसांना केली असल्याचे संदेश पारकर म्हणाले.

आमदार वैभव नाईक अधिवेशनात यावर आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रकाश सुर्वे यांनी शिवसैनिकांचे हातपाय तोडण्याचे केलेले भाष्य, आमदार बांगर यांनी शालेय आहार देणाऱ्या एजन्सीच्या कंत्राटदाराला मारहाण केली आणि इथे नितेश राणे यांनी केलेली मारहाण यावरून या सरकारला सत्तेचा माज आल्याचे दिसत आहे. हा माज शिवसेना उतरविल्याशिवाय राहणार नाही. राणेंची राडा संस्कृती संपविण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या बॉडीगार्डला घेऊन जनतेवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचारामुळे शासकीय कर्मचारी जिल्ह्यात यायला घाबरतात. असे पारकर म्हणाले.

शिवाजी खरात यांच्यावर विनयभंगाची तक्रार नोंद झाली आहे. त्याबाबत त्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी आणि त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, अशीही शिवसेनेची भूमिका आहे. महिलांवर अन्याय होत असेल तर आरोपींना पाठीशी घालण्याची सेनेची भूमिका नाही. मात्र नितेश राणेंनी महिलांच्या आडून अशाप्रकारहे राजकारण करू नये. खरंतर मारहाणीचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी नितेश राणेंनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला भाग पाडले आहे. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी. देवगड नगरपंचायत, पंचायत समिती देवगड , कृषी विभाग देवगड आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे तालुक्याचे बीडीओ, कृषी अधिकारी, उमेदचे अधिकारी या साऱ्यांची चौकशी व्हावी.

अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी न्यायालय, पोलीस आहेत. पण स्वतः कायदा हातात घेऊन मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या नितेश राणे यांनी आपण न्यायाधीश नाही हे ध्यानात ठेवावं, असे संदेश पारकर म्हणाले.

अन्यायग्रस्तांची तक्रार पोलीस नोंद करून घेत नसतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा असे आमचे स्पष्ट मत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. जर गुन्हा नोंद केला नाही तर शिवसेना आंदोलन करेल आणि गुन्हा दाखल करायला भाग पाडेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले.

You cannot copy content of this page