केंद्र शाळा सुकळवाडचे ग्रामस्थ झाले आक्रमक
सिंधुदुर्गनगरी ता १७
जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही व प्रशासनाकडून आश्वासन देऊनही ११६ पटसंख्या असलेला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड या शाळेला आवश्यक असलेले शिक्षक नियुक्त केले जात नसल्याने अखेर आज पालक व ग्रामस्थांच्या वतीने शाळेला कुलूप ठोकले. तर जोपर्यंत शिक्षक हजर होत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही. व मुलांना शाळेत पाठविणार नाही .असा पवित्रा पालकांनी घेतला आहे .
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सुकळवाड (सेमी इंग्रजी) या इयत्ता १ ते ७ ची ११६ पटसंख्या आहे. ही मालवण तालुक्यातील दुसरी मोठी पटसंख्या असलेली शाळा आहे. सेमी इंग्रजी माध्यम सुरू आहे.परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याला जबाबदार कोण?
गेली दोन वर्ष पदवीधर शिक्षकाची मागणी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दाखल घेण्यात आलेली नाही. गोरगरीब पालकाच्या मुलाला उत्तम दर्जेदार शिक्षण देण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी असताना त्यांची मानसिकताच दिसत नाही .
जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर व मालवण तालुक्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या शाळेकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे. या शाळेच्या ११६ पटसंखे नुसार ५ शिक्षक मंजूर आहेत . मात्र प्रत्यक्षात ३ शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानी बरोबरच कार्यरत शिक्षकावर अतिरिक्त ताण दिसून येत आहे.वारंवार निवेदन व भेटी घेऊन शिक्षक मागणी करून ही खोटी आश्वासन व प्रत्यक्ष जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू नसतानाही जिल्हांतर्गत बदलीत शिक्षक मिळू शकतो अशी वेळ मारून नेणारी दिशाभूल करणारी खोटी आश्वासन प्रशासनाकडून आतापर्यंत दिली गेली. ही बाब अत्यंत क्लेशदायक व गुणवत्तेला बाधा आन णारी आहे. त्यामुळे मुलावरील या शैक्षणिक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना मिळावे. यासाठी आज बुधवारी सकाळी १० वाजले पासून शिक्षक मिळे पर्यंत बेमुदत शाळा बंद आंदोलन सुकळवाड ग्रामस्थानी सुरु केले असून आज शाळेला टाळे ठोकले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकान्त दाभोलकर, उपसरपंच स्वप्निल गावडे, बाबुराव मसुरकर, भाऊ पाताडे, विलास बिलये, संतोष बिलये, बाबुराव पाताडे,आदिसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
*अखेर शिक्षक नियुक्त
सुकळवाड ग्रामस्थांच्या शाळा बंद आंदोलनासंदर्भात शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता या शाळेला आजच नव्याने एक शिक्षक नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
